मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून चर्चेत असलेले तत्कालीन शिवसेना नेते आणि सध्याचे शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसणार आहे. बंजारा समाजाचा चेहरा म्हणून राठोडांकडे पाहिले जात होते. परंतु आता राठोडांनाच टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती. अखेर महंतांनी स्वत: हा खुलासा केला आहे.
महंत सुनील महाराज हे शिवबंधन बांधणार असल्याचं समोर आले आहे. याबाबत स्वत: महंतांनी स्पष्टीकरण दिले आहे. महंत सुनील महाराज म्हणाले की, बंजारा समाजाचे प्रश्न घेऊन, समाजहिताचे प्रश्न, पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासाचे प्रश्न घेऊन मुंबईत गेलो असता बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेलो तिथे मिळालेली वागणूक ही न सांगण्यासारखी आहे. मला त्या कार्यालयात ४ तास थांबवून ठेवले. त्यानंतर भेट झाल्यानंतर मंत्र्यांनी १० मिनिटेही वेळ दिला नाही. त्यांच्या देहबोली आणि वृत्तीवरून माझी उपस्थिती त्यांना खटकत असल्याचं दिसून आले असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्यांच्यासाठी आपण सहकार्य केले, यानंतर माझे सामाजिक, धार्मिक कार्यात माझे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. परंतु राजकीय मैदानात माझे आणि संजय राठोड यांचे संबंध राहणार नाही. बंजारा समाजासाठी, सत्तेत वाटा मिळण्यासाठी, बहुजन आणि बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व विधानसभेत करण्यासाठी मी शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश करणार आहे असं महंत सुनील महाराज यांनी म्हटलं.
बंजारा वोट बँक शाबूत ठेवण्याचे आव्हानशिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर, राज्यातील बंजारा वोट बॅंक शाबूत ठेवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू आहे. नुकतेच शिवसेनेच्या नेत्यांनी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा धर्मगुरू संत बाबुसिंग महाराज यांच्यासह संत-महंतांची भेट घेत चर्चा केली होती. बंजारा संत, महंतांची भेट घेण्यासाठी पक्षप्रमुख ठाकरे पोहरादेवीत जाणार असल्याचंही समोर आले होते. त्यानंतर आता बंजारा समाजाचे महंत हाती शिवबंधन बांधणार असल्याने मंत्री संजय राठोड यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.