कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा मनोज जरांगे यांच्या हस्ते सपत्नीक करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आज केली आहे. शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपुरात येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता मराठा क्रांती मोर्चाने मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते महापूजा करावी अशी मागणी केली आहे.
दरवर्षी कार्तिकीची विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. यावेळी मात्र दोन उपमुख्यमंत्री असल्याने महापूजेला कोणाला निमंत्रण द्यायचे याचा मंदिर समितीपुढे पेच निर्माण झालेला असतानाच सकल मराठा समाजाने मात्र उपमुख्यमंत्र्यांचा हस्ते करण्यात येणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध केला आहे.
कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेला दोन्ही उप मुख्यमंत्र्यांपैकी कोणाला बोलवायचे, याबाबत मंदिर समितीने शासनाच्या विधि व न्याय विभागाकडून अभिप्राय मागितला होता; मात्र अद्यापही उत्तर न मिळाल्याने मंदिर समितीसमोरचे कोडे कायम आहे. त्यामुळे यंदाच्या महापूजेला देवेंद्र फडणवीस येणार की अजित पवारांना संधी मिळणार, याची उत्सुकता कायम आहे.
२३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. आषाढीला मुख्यमंत्री, तर कार्तिकीला महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो. सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मागील महिन्यात मंदिर समितीच्या बैठकीत विधि व न्याय विभागाकडून अभिप्राय घेऊनच निमंत्रण देण्याचे ठरले होते. त्यानुसार मंदिर समितीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहारही केला; मात्र अद्याप उत्तर आलेले नाही.