पंढरपूर : कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा गुरुवार २३ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरा होत आहे. एक दिवसावर सोहळा येवून ठेपला आहे. त्यामुळे संताचे लहान मोठे पालखी सोहळे पंढरपूरनजीक दाखल झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सकल मराठा समाजाने देखील या कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजेत उपमुख्यमंत्र्यांच्या सहभागाला विरोध केल्याने पेच निर्माण झाला होता. यादरम्यान मराठा समाजाच्या आंदोलकांनी प्रशासनासमोर पाच मागण्या केल्या होत्या. यावर, काल जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समाजाच्या पाचही मागणी मान्य केल्याने मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेतील सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडणार आहे. यंदा २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. तसेच, सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने कुणबी जातीच्या नोंदी वेगाने शोधणे, मराठा भवन बांधणे, सारथीचे उपकेंद्र सुरू करणे, मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधणे व मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचा वेळ मिळणे, या मागण्या करण्यात आल्या. त्यावर जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकल मराठा समाजाने केलेल्या उपरोक्त पाचही मागण्या तात्काळ मान्य केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत ३० मिनिटे चर्चा करणार आहेत. दरम्यान, कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आज (२२ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजता पंढरपूरात येणार आहेत. त्यानंतर पहाटे अडीज वाजता पूजा सुरू होणार आहे. तर कार्तिकी एकादशी निमित्त संताचे लहान मोठे पालखी सोहळे पंढरपूरनजीक दाखल झाले आहेत. येथील ६५ एकर येथे देखील लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. भाविक राहुट्या, तंबू, मंडप उभारुन वास्तव्य करु लागले आहेत. ६५ एकरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती येथील प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.