महाराजांनी मागण्या करायच्या नाहीत, फक्त आदेश द्यायचे- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 08:12 PM2019-09-15T20:12:44+5:302019-09-15T20:13:18+5:30
सातारा: महाराजांनी मागण्या करायच्या नसतात. त्यांनी केवळ आदेश द्यायचे असतात. त्यांनी दिलेले आदेश हा मावळा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ...
सातारा: महाराजांनी मागण्या करायच्या नसतात. त्यांनी केवळ आदेश द्यायचे असतात. त्यांनी दिलेले आदेश हा मावळा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सर्व मागण्यांवर भाष्य केलं. उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर पहिल्यांदाच भाजपाची साताऱ्यात सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंनी तोंडभरुन कौतुक करत काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
छत्रपतींच्या घराण्यानं तुम्हाला खूप काही दिलं. पण तुम्ही त्यांना काय दिलं, असा प्रश्न काँग्रेस, राष्ट्रवादीनं स्वत:ला विचारावा, असा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. छत्रपतींचं घराणं हे घेणारं घराणं नाही, तर देणारं घराणं आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले. राज्यातलं महायुतीचं सरकार समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करतंय. 5 वर्षांत शेतकऱ्यांना 50 हजार कोटी देण्यात आले आहेत. रस्त्यांची कामं मार्गी लावण्यात आली आहेत. साताऱ्यातले प्रकल्पदेखील पूर्ण केले जातील, असं फडणवीस यांनी म्हटलं.
साताऱ्यातली रस्त्यांची कामं करावीत. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावं, अशा मागण्या उदयनराजेंनी त्यांच्या भाषणातून मुख्यमंत्र्यांकडे केल्या. त्यावर बोलताना महाराजांनी मागण्या करायच्या नसत्या. त्यांनी केवळ आदेश द्यायचे असतात असं मुख्यमंत्री म्हणाले. उदयनराजे, शिवेंद्रराजे यांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण होतील, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंना आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयराजेंना प्रचंड बहुमतानं निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं.