२३६९ ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला सुरुवात; बारामतीत अजितदादा गट-भाजप थेट लढत, गुलाल कोणाचा?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 09:39 AM2023-11-05T09:39:23+5:302023-11-05T09:43:47+5:30
Gram Panchayat Elections 2023: महायुतीत एकत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपने बारामतीत मात्र एकमेकांविरोधात मैदानात असल्याचे पाहायला मिळत आहे.
Gram Panchayat Elections 2023: राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत असून, मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, अनेक ठिकाणच्या लढतींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यात मात्र ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात अजित पवारांचे कुटुंब ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीत असूनही अजित पवार गट आणि भाजपने एकमेकांविरोधात पॅनेल उभी केल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली ही ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी दरवेळी महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुका पार पडतात. पण यावेळी महापालिका निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. महापालिका निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणुका मानले जाते. आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत असल्यामुळे जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे? हे या निवडणुकांमधून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
बारामतीत अजित पवार गट आणि भाजपमध्ये थेट लढत
पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या काटेवाडी ग्रामपंचायतीचा समावेश होतो. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचे मतदान काटेवाडी ग्रामपंचायतमध्ये आहे. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले. यामुळे या ठिकाणची लढत लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. इंदापूर तालुक्यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, काटेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचाच विजय होईल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी मतदानावेळी व्यक्त केला आहे. मी १९५७ पासून काटेवाडीत मतदान करते आहे. पुर्वीच्या काटेवाडीत आणि आताच्या काटेवाडीत भरपूर बदल झाले आहेत. अनेकांनी यासाठी हातभार लावला आहे. राज्यातील अनेकांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, असे सगळ्यांना वाटते. तसेच आई म्हणून माझ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. माझे वय आता ८४ झाले आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे मलाही अजित पवारांना मुख्यमंत्री झालेले बघायला आवडेल, अशी इच्छा अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी बोलून दाखवली.