सचिन लुंगसे
मुंबई : महाराष्ट्रात एप्रिल ते जुलै, २०१९ या चार महिन्यांमध्ये सहा लाखांहून अधिक वेळा विजांचा कडकडाट झाल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे दररोज सरासरी पाच हजार वेळा वीज चमकली आहे. वीज कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळता याव्यात म्हणून, हवामान खात्याने वीज चमकणे आणि ती कोसळण्यापूर्वी माहिती देणारी यंत्रणा नुकतीच कार्यान्वित केली आहे. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे.
क्लायमेट रेजिलिएंट ऑब्झर्विंग सीस्टम प्रमोशन काउंसिलच्या म्हणण्यानुसार, हवामान खात्याकडून विजेची माहिती देणाºया सेंसर व्यतिरिक्त उपग्रह आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंटसारख्या संस्थांकडून प्राप्त आकडेवारीच्या विश्लेषणानंतर हा अहवाल समोर आला आहे. अहवालानुसार, ओरिसामध्ये नऊ लाखांहून अधिक वेळा वीज कोसळली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रत्येकी सहा लाखांहून अधिक वेळा वीज चमकली. मध्य प्रदेशात ४ लाख ८१ हजार ७२१ वेळा वीज चमकली. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी म्हणजे २० हजारांच्या जवळपास वीज चमकली. हवामान खात्याने याच वर्षी वीज चमकणे आणि ती कोसळण्यापूर्वी माहिती देणारे ‘दामिनी’ नावाचे अॅप कार्यान्वित केले. ‘नाउ-कास्ट वॉर्निंग’ या नावानेही ते ओळखले जात आहे. चमकणाºया, कोसळणाºया विजेबाबत माहिती देण्यासह मनुष्यहानी होऊ नये, म्हणून ही सीस्टिम हवामान खात्याने कार्यान्वित केली. वीज कोसळण्याची माहिती आगाऊ मिळाली, तर नक्कीच जीवितहानी रोखता येईल, हा यामागचा हेतू आहे.
तीन वर्षांत घटनांमध्ये वाढवैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांत वीज कोसळण्याच्या घटनांत एक हजार पटीने वाढ झाली आहे. कडाक्याचा उन्हाळा आणि विलंबाने दाखल होणाºया मान्सूनमुळे वीज कोसळण्याच्या घटनांत वाढ होत आहे. सुका दुष्काळ आणि त्यानंतर पडणारा ओला दुष्काळ यास कारणीभूत आहे.
दरवर्षी दोन हजार जणांचा वीज कोसळून मृत्यूदेशभरात प्रत्येक वर्षी सरासरी २ हजार ते २ हजार ५०० नागरिकांचा वीज कोसळल्याच्या दुर्घटनेत मृत्यू होतो. २०१८ साली हा आकडा वाढला. वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ हजार नागरिकांना जिवास मुकावे लागले. देशभरात एप्रिल, २०१९ पासून जुलै, २०१९ पर्यंत म्हणजे चार महिन्यांत ६५.५५ लाख वेळा वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांत १ हजार ३११ जणांचा मृत्यू झाला असून, यापेक्षा दुप्पट लोक जखमी झाले आहेत. चार महिन्यांत देशभरात २३.५३ लाख (३६ टक्के) अशा घटना क्लाउड टू ग्राउंडच्या लायटनिंगच्या आहेत. म्हणजे वीज कडाडतानाच ती जमिनीवर कोसळली आहे. यामुळे वृक्ष, प्राणी, मनुष्याचे अधिकाधिक नुकसान होते. अहवालातील मृतांचा आकडा हा राज्य सरकारासह माध्यमांच्या वृत्त संकलनानंतर जारी करण्यात आला आहे.