मुंबई /ठाणे : वांद्रे-कुर्ला संकुल मैदान आणि ठाणे येथे कोरोनाला हरविण्यासाठी रुग्णालये युद्धपातळीवर उभारण्यात आली असून कोरोनाला हरवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांत महाराष्ट्र जगाच्या मागे नाही, तर पुढे आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईसह राज्यात काही लाख खाटा उपचारासाठी तयार केल्या आहेत. ही मोठी गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.आपण रुग्णालये, आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत. मात्र त्याचा वापर करण्याची वेळ कुणावरही येऊ नये, अशीही प्रार्थना त्यांनी केली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने वांद्रे-कुर्ला संकुल येथील मैदानावर दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या १ हजार खाटांच्या रुग्णालयाचा हस्तांतरण कार्यक्रम आणि ठाण्यात उभारण्यात आलेल्या १ हजार खाटांच्या कोरोना रुग्णालयाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येकाचे आयुष्य बदलले आहे. या विषाणूने प्रत्येकाला काही ना काही शिकवले आहे. संकटाचा सामना कसा करायचा हेदेखील कोरोनाने आपल्याला शिकवल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.मुंबईत मोकळ्या मैदानावरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या खाटा तयार करण्याची किमया यंत्रणांनी केली. मुंबईतील मोकळ्या मैदानांवर १० ते १५ दिवसांच्या कालावधीत १ हजार खाटांच्या सर्व सुविधायुक्त रुग्णालयांची निर्मिती होते. ही कामगिरी थक्क करणारी आहे. देशात अन्यत्र कुठेही अशा प्रकारच्या मोकळ्या मैदानावरील रुग्णालयात आयसीयूची सुविधा उपलब्ध नाही. महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीची सचित्र माहिती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना देऊ, असे ते म्हणाले. दरम्यान, अवघ्या २४ दिवसांमध्ये ठाणे कोरोना रुग्णालयाची उभारणी केली आहे. बाळकुम-साकेत येथे १ हजार २४ खाटांचे तळ अधिक १० मजल्यांचे हे रुग्णालय आहे, याचेही लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केले.मालेगाव, धारावीत यशदाट लोकवस्तीत राहणाºया ५५ वर्षांवरील व्यक्तींची तपासणी केली जात आहे. त्यांच्या रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण मोजले जात आहे. अशा व्यक्तींना कोरोनापासून वेळीच रोखणे शक्य होईल. ट्रॅकिंग, ट्रेसिंगचा मालेगाव आणि धारावीमध्ये यशस्वी झालेल्या प्रयोगाचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.दरदिवशी ३० रुग्ण होतात बरे : सद्य:स्थितीत ५०० पेक्षा अधिक रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. मागील काही दिवसांपासून दर दिवशी सुमारे ३० रुग्ण निरोगी होऊन घरी परतत आहेत.८५ वर्षांच्या महिला डॉक्टरांची मदत : मुख्यमंत्री मदतनिधीसाठी ८५ वर्षांच्या महिला डॉक्टरांनी बुधवारी सकाळी धनादेश सुपुर्द केला. त्या महिला म्हणजे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त राजीव यांच्या मातोश्री असल्याचा उल्लेख ठाकरे यांनी या वेळी केला.असे आहे वांद्रे-कुर्ला संकुल टप्पा २ रुग्णालयअतिरिक्त १२०० खाटांचे आयसीयू, डायलिसिसची सुविधा, मुंबई पालिकेकडे हस्तांतरित.१०८ आयसीयू खाटा, १२ खाटा डायलिसिससाठी.४०६ खाटा विना आॅक्सिजन आणि ३९२ खाटा आॅक्सिजन सुविधायुक्त.
CoronaVirus News: कोरोनाला हरविण्यात महाराष्ट्र जगाच्या पुढे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 4:35 AM