"महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल न बोललेलंच बरं, आणखी किती खालची पातळी गाठणार कुणास ठाऊक?, गचाळ - गलिच्छ करून टाकलंय सगळं..." अशा प्रतिक्रियांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. गावातल्या छोट्याशा दुकानापासून ते सुपरमार्केट/मॉलपर्यंत आणि वडाप(रिक्षा) पासून ते विमानापर्यंत लोक राजकीय नेत्यांबद्दल फारसं बरं बोलत नाहीत. अर्थात, सरकार - मग ते कुठल्याही पक्षाचं असो, नेहमीच 'सॉफ्ट टार्गेट' राहिलंय. घरगुती समस्येपासून ते मोठ्या घोटाळ्यांपर्यंत, जनता सरकारवर - नेत्यांवर टीका करत असते/ कधी कधी 'भडास' काढत असते. हे चालत आलंय, पुढेही चालत राहील. पण, नेत्यांच्या भाषेचा घसरलेला स्तर आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलचा संपत चाललेला आदर, ही एकूणच राजकारणासाठी चिंताजनक गोष्ट आहे.
महाराष्ट्राची संतपरंपरा ही अखिल मराठीजनांसाठी गौरवाचा, अभिमानाचा विषय आहे. राजकीय नेतेसुद्धा (कधी कधी राजकारणासाठी का होईना) या संतपरंपरेची थोरवी सांगत असतात. संतांच्या ओव्या, अभंग विरोधकांना टोमणे मारण्यासाठी वापरले जातात. त्यावर हरकत घ्यायचा प्रश्न नाही. उलट, त्यांचं कुठे चुकतंय, हे सांगण्यासाठी आपणही संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा दाखला देऊया. कदाचित त्यांचेच 'शब्द' परिणामकारक ठरतील.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।।शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जन लोका ।।तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव ।शब्देंचि गौरव पूजा करू ।।
तुकाराम महाराजांनी या अभंगात शब्दांना 'रत्न' म्हटलं आहे. शब्द किती मौल्यवान आहेत, हे यातून लक्षात येऊ शकतं. त्यामुळे त्याचा वापर किती जपून करायला हवा, याचाही अंदाज येईल. पण, आज अनेक नेते रागाने, द्वेषाने, त्वेषाने जी भाषा बोलताना दिसतात, ती सार्वजनिक जीवनात शोभणारी नाही. कदाचित त्यांनी अभंगाच्या दुसऱ्या ओळीचा चुकीचा अर्थ घेतला असावा. 'प्रयत्नपूर्वक आम्ही या शब्दांना शस्त्र बनवू', असं महाराजांनी म्हटलं आहे. पण हे शस्त्र कुठे, कुणावर, कसं वापरावं याचाही विचार करायची गरज आहे. आपण जे बोलतो, ते टीव्ही, सोशल मीडियावर दाखवलं जातं, अनेक घरांमध्ये पाहिलं जातं. सर्वच वयोगटातले लोक ते ऐकत असतात, पाहत असतात. त्यांच्या मनात आपण आपली काय प्रतिमा निर्माण करतोय, हे समजून नेत्यांनी शब्दांची निवड करायला हवी. कारण, राजकारणात तुमची 'प्रतिमा' खूप महत्त्वाची आहे. फक्त कार्यकर्त्यांमध्ये नाही, जनतेतही. केवळ शब्दांचा योग्य वापर केल्याने ती सुधारत असेल, तर प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?
मागे एक खूप मार्मिक वाक्य ऐकलं. "वयाच्या दुसऱ्या वर्षी आपण बोलायला लागतो, पण कुठे-कधी-काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही, हे समजून घेण्यात पुढची बरीच वर्षं जातात. काहींना तर ते आयुष्यात समजत नाही". अशा अनेक व्यक्ती तुमच्याही पाहण्यात असतील. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' या बॅनरखाली आपल्याकडे सगळंच खपून जातं/खपवलं जातं. टीका करणं, विरोध करणं, आंदोलन करणं हा आपला अधिकार आहे. राजकारणात तर हे प्रभावी शस्त्र ठरतं. पण, धनुष्यातून सुटलेला बाण आणि ओठातून बाहेर पडलेला शब्द मागे घेता येत नाही, हे लक्षात ठेवून हे शस्त्र वापरलं गेलं पाहिजे. आम्ही काही वैयक्तिक शत्रू नाही, असं नेते म्हणत असतात. पण, काही जण समोरच्या नेत्यावर ते शत्रूपेक्षाही वाईट पद्धतीने शब्दांचे वार करत असतात. अलीकडच्या काळात, चर्चेत येण्यासाठी वादग्रस्त, आक्षेपार्ह, प्रक्षोभक बोलण्याचे प्रकार वाढलेत. खूपच अंगाशी आल्यास, 'भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो', अशी सारवासारव केली जाते. त्यात दिलगिरीपेक्षा उपकार केल्याचंच भासवलं जातं. हा 'ट्रेंड' थांबायला हवा.
'राजकारण' हे नेतेमंडळींचं काम/जॉब आहे. सत्तेच्या खुर्चीसाठी रणनीती, चाणक्यनीती आखणं, विरोधकांचे डावपेच हाणून पाडणं, त्यांच्यावर टीकेचे बाण सोडणं हा त्यांच्या कामाचा भाग आहे. पण, हे सगळं करताना एक मर्यादा आखून घेण्याचीही गरज दिवसेंदिवस प्रकर्षाने जाणून लागलीय. सर्वपक्षीय नेत्यांनी आजच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, नववर्षाच्या प्रारंभी तसा संकल्प करायला हवा. आजपासून 'शोभन' नावाच्या संवत्सराची सुरुवात होत आहे. या 'शोभन' संवत्सरात आम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल असं वागू-बोलू, अशोभनीय वक्तव्य आणि वर्तन करणार नाही, अशी शपथ सर्वांनी गुढीपुढे घ्यावी. कारण, 'यथा राजा तथा प्रजा', या उक्तीनुसार राज्यकर्ते-राजकीय नेते चांगलं वागू लागले, तर लोकांमध्येही त्याचे सकारात्मक पडसाद उमटतील आणि राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलेल.