मुंबई : राज्यातील कंटेन्मेंट क्षेत्राबाहेरची चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह पाच नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. राज्य शासनाने बुधवारी हा निर्णय घेतला. मार्चपासून कोरोनामळे केलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद होती. त्यामुळे चित्रपट, नाट्य व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसला. मनोरंजन क्षेत्र खुले करण्याची मागणी सातत्याने होत असताना आता पुनश्च हरिओम होत आहे. ५ तारखेच्या मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ही भेट दिली आहे. सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्समध्ये खाण्याचे पदार्थ मात्र घेऊन जाता येणार नाहीत.
क्रीडाप्रेमींसाठीही चांगली खबर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसाठी कंटेन्मेंट क्षेत्राबाहेरील स्विमिंग पूल ५ नोव्हेंबरपासून खुले करण्यात येतील. टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, शूटिंगसारख्या इनडोअर गेमनादेखील परवानगी देण्यात आली आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. यासंबंधीची एसओपीही लवकरच जारी करण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्यूटदेखील सुरू होत आहेत.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल चित्रपटगृहे बंद असल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीचे सुमारे ४०० कोटींचे नुकसान झाले असून अनेक कलावंत, तंत्रज्ञ व या व्यवसायाशी संबंधित आर्थिक विवंचनेत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने कालच्या (३ नोव्हेंबर) अंकात दिले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत सरकारने अखेर पडदा उघडण्यास परवानगी दिली आहे.