मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघ्या पाच दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे युती व महाआघाडीतील पक्ष एकमेकांवर आरोप करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तर भाजप-शिवसेनेने युती केल्यानंतर सुद्धा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे. सोमवारी रिसोड येथे झालेल्या सभेत आदित्य यांनी, शेतकऱ्यांची कर्जमाफी पुरेशी नसल्याची टीका करीत अप्रत्यक्षरीत्या भाजपला टोला लगावला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शेवटच्या टप्प्यात रंगत येऊ लागली आहे. पाच वर्षात काय केले ? असे म्हणत विरोधक भाजप-शिवसेनेवर निशाणा साधत आहे. तर केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडून सत्ताधारी पक्ष प्रचार करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे युती व महाआघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र अशात आदित्य ठाकरे यांनी रिसोड येथे झालेल्या सभेत भाजपवरचं टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आदित्य ठाकरे यांची सोमवारी वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे सभा झाली. यावेळी आदित्य यांनी नेहमीप्रमाणे शेतकरी कर्ज माफीचा मुद्दा आपल्या भाषणातून मांडला. मात्र याचवेळी त्यांनी कर्ज माफीच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा सुद्धा साधला. शिवसेनेने नेहमीच शेतकऱ्यांची बाजू घेतली असून, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मतांचा जागेवाही त्यांनी यावेळी मागितला.
भाजप सरकारनं गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना ५० हजार कोटींची कर्जमाफी थेट त्यांच्या खात्यात दिली असून, ५० लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे आता आदित्य ठाकरे यांनी कर्जमाफीचा लाभ अजूनही संपूर्ण शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचा दावा केला, असल्याने कर्जमाफीच्या मुद्यावरून सेना-भाजपमध्ये एकमत नसल्याचे पहायला मिळत आहे.