मुंबई : माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख तिसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहे. या निवडणुकीत अमित यांच्यासोबत बंधू धीरज देशमुख देखील मैदानात उतरले आहे. परंतु, यावेळी अमित यांना काँग्रेसकडून भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीच अमित देशमुख यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यास, अमित देशमुखच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. त्यामुळे लातूर शहरातून अमित यांना विजयी करण्याचे आवाहन थोरात यांनी यावेळी केले.
विलासराव देशमुख आणि दिलीपराव देशमुख या दोघांनी लातूरचा कायापालट केला. या दोघांमुळे लातूर हे राज्यातील प्रगत शहर बनले. आता अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या रुपाने लातुरकरांच्या सेवेत आणखी एक हंसो का जोडा आला आहे. यांनाही लातूरकर भरभरून देतील, असंही थोरात यावेळी म्हणाले.
राज्य काँग्रेसमध्ये उभारी येण्यासाठी काँग्रेस हायकमांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. याआधी अमित देशमुख यांच्यावर कर्नाटक राज्याच्या निवडणुकीची जबाबदारी देखील देण्यात आली होती. आता काँग्रेसकडून अमित देशमुखांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत आहे.