तुळजापूर : दोन माजी मंत्र्यांत लढत होत असल्याने तुळजापूरच्या राजकीय आखाडा चांगलाच तापू लागला आहे. तेच येथील लढतीकडे सबंध राज्याचेही लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर 10 ऑक्टोंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तुळजापुरात सभा घेत आहे. ते या सभेत काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असलेले माजी मंत्री राणाजगजीतसिंह पाटील व महाआघाडीचे उमेदवार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे. उमेदवारी जाहीर होताच हे दोन्ही उमेदवार वेगाने कामाला लागले आहेत. दरम्यान, या मतदारसंघात बंडखोरांची संख्या प्रत्येक वेळी मोठी असते. यावेळी भाजपकडून सार्वधिक इच्छुक होते. मात्र, उमेदवारी जाहीर होताच सर्वच इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेत राणा पाटील यांच्या मागे आपली ताकद उभी केली आहे. देवानंद रोचकरी, अॅड. व्यंकटराव गुंड, अॅड.अनिल काळे यांच्यासह इतरही जनाधार असलेले इच्छुक महायुतीच्या प्रचारात उतरल्याचे दिसून येत आहे. ही बाब भाजपसाठी जमेची ठरली आहे.
तर दुसरीकडे आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीतून अशोक जगदाळे व महेंद्र धुरगुडे या दोघांनी बंडखोरी करत आपले अर्ज कायम ठेवले आहे. तुळजापूरच्या राजकारणावर दीर्घकाळ वर्चस्व राखणारे मधुकरराव चव्हाण हे आव्हान कसे मोडून काढणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
दरम्यान, आता मतदारसंघातील प्रचारधुमाळीला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची पहिलीच सभा तुळजापुरात अमित शहा यांच्या रूपाने होत आहे. जम्मू-काश्मिरातील कलम 370 हटवून नागरिकांत, विशेषत: तरुणांत क्रेज निर्माण केलेले शहा आपल्या आक्रमक भाषणासाठी परिचित आहे. ते तुळजापुरातील हडको मैदानावर 10 ऑक्टोंबर रोजी दुपारी 2.30 वाजता महायुतीचे उमेदवार राणा पाटील यांच्यासाठी सभा घेत असून, यात ते कोणावर आणि कसा घणाघात करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.