मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी काढलेल्या युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून सरसकट कर्जमाफीवरून शिवसेनेने रान उठवले होते. आदित्य यांनी आपल्या अनेक सभेतून राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनाही शेवटपर्यंत सरसकट कर्जमाफी होण्याची अपेक्षा होती. निवडणुका जाहीर होईपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सरसकट कर्ज माफीवरून शिवसेना तोंडघशी पडली असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.
शिवसेनेने आघाडीचं सरकार असताना 'कर्जमाफी देता की जाता' म्हणत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढलेले भाजप- शिवसेनेने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. मात्र सत्तेत असून सुद्धा शिवसेनेने कर्जमाफीचा मुद्दा कायम लावून धरला होता. तर शेवटच्या काळात आदित्य ठाकरे यावरून आक्रमक होताना पहायला मिळाले होते. जो पर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही,तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचे आदित्य म्हणाले होते.
राजकरणाचे काय ते होऊ द्या, मात्र शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार. राज्यातील शेतकऱ्यांची जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याची भूमिका सुद्धा आदित्य ठाकरे यांनी घेतली होती. मात्र ज्या भाजपसोबत पुन्हा शिवसेनेने युती केली आहे. त्या भाजप सरकारने निवडणुका जाहीर होईपर्यंत सुद्धा सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला नसल्याने, युती झाली पण आदित्य ठाकरेंच्या सरसकट कर्ज माफीच्या आश्वासनाचे काय असा प्रश्न विचारला जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीचा मुद्दा गाजणार आहे. तर भाजपवर याच मुद्द्यावरून विरोधक आत्तापासूनच टीका करतांना सुद्धा पहायला मिळत आहे. तर निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शिवसेनेने आता पुन्हा भाजपसोबत युती केली आहे. त्यामुळे निवडणुकीत ह्या मुद्यावरून विरोधीपक्ष भाजप-शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे.