Maharashtra Assembly Election 2019 : बाळासाहेबांची अटक अन् अजित दादांचं स्टेटमेंट, शरद पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 05:56 PM2019-10-14T17:56:42+5:302019-10-14T17:57:12+5:30
Maharashtra Assembly Election 2019 : बाळासाहेबांच्या अटकेसंदर्भातील अजित पवार यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बाळासाहेबांना त्याकाळी अटक करण्यात आलेल्या कृत्यावर मोठा खुलासा केला होता. वरिष्ठांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आल्यांचं अजित पवारांनी सांगितलं होतं. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, पवारांनी उत्तर देण्याचं टाळलं. तसेच, तो आजचा प्रश्न नसून आजचे प्रश्न वेगळेच असल्याचे पवारांनी म्हटले.
शरद पवार यांची बीबीसी न्यूज पोर्टलसाठी मुलाखत घेण्यात आली. त्यामध्ये, बाळासाहेबांच्या अटकेसंदर्भातील अजित पवार यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, तो आजचा प्रश्न नाही, असे पवार यांनी म्हटले. ''ज्या गोष्टी झाल्या त्या काढायच्या कशासाठी? बाळासाहेब आज हयात नाहीत. माझ्यामते ते प्रश्न आजचे प्रश्न नाहीत. आजचा प्रश्न बेकारी आहे, आजचा प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे. आजचे प्रश्न यापेक्षा अधिक गंभीर आहेत. या प्रश्नांना डायव्हर्ड करण्याचं काम सरकार करत असून मीडियाही त्याला बळी पडत आहे. बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रश्न आमच्यापुढे नाही. आज महाराष्ट्राला तो प्रश्न गरजेचा नाही'', असे उत्तर शरद पवार यांनी दिलंय.
दरम्यान, अजित पवारांचा हा इशारा छगन भुजबळांवर होता का, असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला होता. त्यावर, माझा नाईलाज होता, म्हणून मी त्या फाईलवर सही केली, असे भुजबळांनी सांगितलं होतं.