मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याचा शेवटच्या दिवशी पैठण मतदारसंघात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी पक्षाने दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने दोन्हीं उमेदवारांकडून मीच अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला जात होता. मात्र आज झालेल्या अर्ज छाननीमध्ये माजी आमदार संजय वाघचौरे यांचा अर्ज बाद करण्यात आला असून, दत्ता गोर्डे यांचा अर्ज अधिकृत ग्राह्य धरण्यात आला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून तयारी करत असलेले माजी आमदार संजय वाघचौरे यांची पैठण मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित समजली जात होती. मात्र ऐनवेळी भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. तसेच एबी फॉर्म सुद्धा त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केला होता. मात्र त्यांनतर वाघचौरे यांनी सुद्धा मुंबई गाठत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून एबी फॉर्म मिळवत उमेदवारी दाखल केली होती.
राष्ट्रवादीकडून एकाच मतदारसंघात दोघांना एबी फॉर्म मिळाल्याने चर्चेचा विषय बनला होता. तर दोन्हीं नेते आपणच अधिकृत उमेदवार असल्याचा दावा करत असल्याने, स्थानिक कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आज झालेल्या अर्ज छाननीनंतर दत्ता गोर्डे यांचा अर्ज अधिकृत असल्याचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केले असून, वाघचौरे यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
तर पैठण मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्यात थेट लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र त्याचबरोबर संजय वाघचौरे मात्र काय भूमिका घेणार किंवा कुणाला पाठींबा देणार हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पैठण मतदारसंघातील लढत यावेळी लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.