मुंबई : मुसलमानांचं वावडं, मग सत्तार यांना शिवसेनेत प्रवेश कसा दिला जातो असे म्हणत, शिस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेवर अश्लिल भाषेत टीका केली होती. त्यांनतर बुधवारी झालेल्या एका सभेत पुन्हा जाधवांनी शिवसेनेवर टीका केल्याचे पहायला मिळाले. काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेत गेलेले माजी आमदार अब्दुल सत्तार हे हिंदू असून, ते कोकणस्थ ब्राह्मण असल्याचा खोचक टोला जाधव यांनी शिवसेनेला लगावला. पिशोर येथील सभेत ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघ्या तीन दिवसांचा काळ शिल्लक असल्याने राजकीय नेत्यांनी सभांचा धडाकाच लावला आहे. मात्र मतदारांसमोर विरोधकांच्या उखळ्या पाखाळ्या काढताना नेत्यांना सभ्य भाषेचा विसर पडत असल्याचे दिसत आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचीही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली असून, त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मात्र बुधवारी पिशोर येथील आपल्या सभेत जाधव यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षात काय काम केली हे कधीच शिवसेनेचे लोकं सांगत नाही. मात्र हर्षवर्धन जाधवमुळे मुसलमान निवडून आल्याचे ह्यांचे नेते सांगत फिरतात. परंतु मुसलमानांचं वावडं असलेल्या या शिवसेनेला सत्तार कसे चालतात.
अब्दुल सत्तार हे रात्रीतून भगवे झाले. आधी सत्तार यांना शिवसेना हिरवा साप म्हणायचे तर अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमसोबत त्यांचे संबध असल्याचे आरोप सुद्धा करायचे. आता मात्र ते शिवसनेचे अब्दुल भाई झाले. अब्दुल सत्तार मुसलमान नसून हिंदू आहेत. तसेच ते शुद्ध कोकणस्थ ब्राह्मण आहेत. अन्यथा ते शिवसेनेला कसे चालले असते, असा खोचक टोला हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी लगावला.