मुंबई : विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर राज्यात भाजप-शिवसेनेकडून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या मुद्यावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना सेनेचा मुख्यमंत्री बनवायचा पण ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जाण्यास घाबरत असल्याचे ओवेसी म्हणाले. हैदराबाद येथील पक्षाच्या एका कार्यक्रमात ते बोलोत होते.
आपल्या भाषणात बोलताना ओवेसी म्हणाले की, महाराष्ट्रात सुरु असलेल्या भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्ष पाहता या दोन्ही पक्षाला पाठींबा न देण्याची आमची भूमिका असणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचा पाठींबा घेऊन सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र उद्धव ठाकरे यासाठी हिम्मत करणार नाहीत असे ही ओवेसी म्हणाले.
उद्धव यांना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा असेल तर, त्यांनी आधी दिल्लीत बसलेल्या त्यांच्या मंत्र्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिले पाहिजे. मात्र भाजपसोबत जायचे की नाही याबाबत उद्धव ठाकरे यांचे तळ्यात-मळ्यात सुरु आहे. शिवसेनेची परिस्थिती दोन पाऊल पुढे अन् तीन मागे अशी झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मोदींना खूप घाबरतात असा टोला यावेळी ओवेसींंनी लगावला.
'इश्क करना है तो आग में कूद जाओ' म्हणत मुख्यमंत्री बनवायचाचं असेल तर घाबरता कशाला, थेट निर्णय घ्यावा असा टोला ओवेसींनी उद्धव ठाकरेंना लगावला. मात्र आमच्या पक्षाला तुमच्या सत्तेशी काहीही देण-घेणे नसून आम्हाला मंत्रीपदाची कोणतेही अपेक्षा नसून ज्याला कुणाला मुख्यमंत्री बनवायचा आहे त्यांनी खुशाल बनवावा असे ही ओवेसी म्हणाले.