मुंबई : आचारसंहिता लागू झाल्यापासून सुरु असलेली निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी दुपारी ३ वाजता शांत झाली. त्यामुळे आता कुणालाच जाहीर सभा घेता येणार नाही. तर गेली चार आठवडे महराष्ट्रात प्रचाराची धामधूम अनुभवायला मिळाली. युती आणि महाआघडीच्या नेत्यांनी मैदान गाजवलं तर मनसे प्रमुख राज ठाकरेंसुद्धा प्रचाराच्या आखाड्यात उतरले असल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या २८ दिवसांच्या काळात सर्वच राजकीय पक्षातील महत्वाच्या नेत्यांच्या राज्यभर सभा पार पडल्या. भाजपच्या वतीने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर सभा घेतल्या, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर आदित्य ठाकरे हे सुद्धा प्रचाराच्या आखाड्यात उतरले होते. दुसरीकडे राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर व मनसेचे राज ठाकरे यांनी सुद्धा विविध मतदारसंघात मोठ्याप्रमाणावर सभा घेतल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात एकूण ९ सभा घेतल्या, तर अमित शहा यांनी २१ सभा आणि १ ठिकाणी रोड शो केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ४८ सभा, ३ रोड शो व १ माँर्निंग वॉक केला. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ४८ सभा विविध मतदारसंघात घेतल्याचे पाहायला मिळाले. तर शेवटच्या टप्यात साताऱ्यातील चर्चेची ठरलेली सभा मिळवून शरद पवारांनी एकूण ४३ सभा घेतल्या.
प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एकूण ४६ सभा घेतल्या. तर एमआयचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी २५ ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. त्याचप्रमाणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ २० सभा घेतल्या. तर प्रचाराची धामधूम जरी संपली असली तरीही उमेदवारांची धाकधूक कायम आहे.