मुंबई - विधानसभा निवडणुकीत बंडखोरांना रोखण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान होते. यात काही प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांना यश सुद्धा आले आहे. मात्र असे असताना सुद्धा भाजपचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे आणि जिल्ह्या परिषद सदस्य राजेश परजणे यांनी बंडखोरी कायम ठेवली असल्याने कोपरगाव मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कोपरगाव मतदारसंघ युतीत अपेक्षप्रमाणे भाजपकडे असून, पुन्हा स्नेहलता कोल्हे यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र कोल्हे यांना विरोधकांपेक्षा भाजपचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मेहुणे राजेश परजणे यांच्या बंडखोरीची चिंता लागली आहे. परजणे यांनी कोपरगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ते ठाम आहे.
परजणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विखे कुटंबाकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे खुद्द राधाकृष्ण विखे यांनी सुद्धा त्यांना उमेदवारी मागे घेण्याचे सांगितले असल्याचे बोलले जात आहे. मात्र परजणे यांनी माघार घेतली नसून, बंडखोरी कायम ठेवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बंडखोराना शांत करणारे राधाकृष्ण विखे पाटील स्व:ताच्या मेहुण्याची मनधरणी करण्यात अपयशी ठरले असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
गोदावरी दुध संघाचे अध्यक्षपद परजणे यांच्याकडे असून ते जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आहेत. तर भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विखेंना मानणारा वर्ग आणि नातेगोत्यातील लोकं परजणे यांच्या पाठीशी उभा राहू शकतात असेही बोलले जात आहे. त्यातच परजणे यांचा सुद्धा मतदारसंघात चांगली पकड असल्याने, त्यांचा निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजप उमेदवार कोल्हेंच्या अडचणी वाढू शकते.