मुंबई : गेल्या दोन आठवड्यापासून गायब असलेला पाऊस पुन्हा एकदा परतला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी आणि सोमवारी काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर पावसाने हजेरी लावल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. त्याचवेळी राज्यभरात पावसांने जोर धरला आहे. सोमवारी मतदान असून मतदानावर देखील पावसाचे सावट आहे. त्यामुळे मतांच्या टक्केवारीत घट येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून अधिक व्यापक प्रयत्न केले जात असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
शनिवारी झालेल्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रे पाण्यात बुडाली होती. तसेच काही मतदान केंद्रांना गळती लागली होती. तर बनोटी मंडळातील मतदान केंद्र असलेल्या शाळांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने मतदान केंद्रे पुराच्या पाण्यात बुडाली होती. मात्र पाणी ओसरताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने शाळेतील शिक्षक व निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राच्या परिसरात मुरूम टाकून दुरूस्ती केली आहे.
सोमवारी होणाऱ्या मतदानावेळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होऊ नयेत म्हणून, यावर आधीच उपाययोजना करण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून सुरु आहे. काही ठिकाणी प्रशासनाकडून वॉटरप्रुफ मंडपांच्या निर्मितीची तयारी करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मतदानावर असलेल्या पावसाच्या सावटाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे.