मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध नेत्यांनी निवडणुका लढवण्याचे आवाहन केले होते. मात्र ऐनवेळी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला असल्याचे पहायला मिळाले. त्याचप्रमाणे आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी तासगावातून आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली होती. मात्र महायुतीत ही जागा शिवसेनेकडे गेली असल्याने सीमा आठवले तिसगावमधून निवडणूक लढवणार असल्याच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे.
तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघातून आपण इच्छुक असल्याचं सीमा आठवले यांनी महिला मेळाव्यात बोलताना सांगितले होते. हा मतदारसंघ आर. आर. पाटील यांचा बालेकिल्ला होता. आबांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी विजय मिळवला होता. तर यावेळीही सुद्धा राष्ट्रवादीकडून तासगावातून सुमन पाटील यांनाच उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात खरचं सीमा आठवले ह्या निवडणूक लढवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटला असून हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असून येथून माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सीमा आठवले यांनी या मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलीच नाही. त्यामुळे तासगावात आर. आर. आबांच्या पत्नीविरोधात आठवलेंच्या पत्नीची निवडणूक लढवण्याची इच्छा अपूर्ण राहणार असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.