'बंडोबाणांचा' संडे: बंडखोरांना शांत करण्याचे पक्षांसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 11:46 AM2019-10-06T11:46:28+5:302019-10-06T12:10:42+5:30
बंडखोर पक्ष उमेदवाराच्या विनंतीला मान देतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बऱ्याच मतदारसंघात महत्वाच्या पक्षातील इच्छुकांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरले आहे. तर त्यातील अनेकांचे उमेदवारी अर्ज शनिवारी झालेल्या छाननीत वैध सुद्धा ठरले आहे. त्यामुळे पक्षाचे अधिकृत उमेदवारांची चिंता वाढली असून, बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी पक्ष उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. तर आज रविवार असल्याने उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा उद्याचा ( सोमवार ) शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 'बंडोबाणांचा' संडे असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.
अर्ज छाननी होताना अनेक बंडखोरांचे अर्ज रद्द होतील, अशी अपेक्षा सर्वच पक्षातील अधिकृत उमेदवारांना होती. मात्र बऱ्याच ठिकाणी बंडखोरांचे अर्ज वैध ठरली आहे. त्यामुळे पक्ष उमेदवारांची चिंता वाढली आहे. तर सर्वच पक्षातील पक्षश्रेष्ठींनी बंडखोरांवर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे.तसेच पक्ष उमेदवार यांनी बंडखोरांच्या भेटीगाठी घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आलेल्या संधीचं सोण करू पाहणाऱ्या बंडखोरांनी उमेदवारांकडे आश्वासनांची यादीच सादर केली असल्याचे सुद्धा काही ठिकाणी पहायला मिळत आहे.
आज रविवार असल्याने सोमवारीच अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस बंडखोरांना सांभाळताना पक्ष उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत राजकीय परिस्थितीविषयी उत्कंठा वाढली असून बंडखोर पक्ष उमेदवाराच्या विनंतीला मान देतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भाजप-शिवसेनेत सुद्धा मोठ्याप्रमाणावर बंडखोरी झाली असल्याचे चित्र आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसात बंडखोरांनी माघार घ्यावे अन्यथा कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर सुद्धा पक्षाच्या नेत्यांंकडून बंडखोरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. तर अनेक बंडखोरांनी आता माघार नाहीच, अशी भूमिका घेतली असल्याने पक्ष उमेदवार यांच्या अडचणी वाढल्या आहे.