मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडले आहे. तर युतीतील दोन्ही पक्षांनी सुद्धा राज्यातील विविध मतदारसंघात महत्वाच्या नेत्यांच्या सभेंचा धडाकाच लावला आहे. मात्र भाजपकडून स्थानिक प्रश्न सोडून कलम 370 च्या मुद्यावर भर दिला जात असल्याचे आरोप होत असताना, आता शिवसेनेने सुद्धा आपल्या प्रचारात कलम 370 वर भर दिला असल्याचे पहायला मिळत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे मंत्र्यांनी आपल्या भाषणातून शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न यासारख्या स्थानिक मुद्द्यांऐवजी देशभक्ती आणि कलम 370 च्या मुद्द्यांवर भर दिला असल्याचा आरोप होत आहे. मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सुद्धा कलम 370 च्या मुद्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपप्रमाणे शिवसेनेचा सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात कलम 370 चा मुद्दाच अजेंडा असणार असल्याचे चर्चा पहायला मिळत आहे.
शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव यांनी कलम 370 वर भर दिला होता. त्यांनतर बुधवारी अहमदनगरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कलम 370 काढले गेले, हे आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. कलम 370 हटवणार हे आमच्या 'वचन'नाम्यात वचन होते, आणि ते आम्ही पाळले सुद्धा. ज्यावेळी आम्ही हे वचन दिले त्यावेळी काँग्रेसवाले म्हणत होते. काही झाले तरीही आम्ही कलम 370 रद्द करणार नाही. असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही गप्प्प बसणार नाही, अशी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे आता पुन्हा सरकार आल्यावर कर्जमाफी करणारच असे म्हणत आहे. तर भाजपप्रमाणे शिवसेना सुद्धा कलम 370 मुद्दा आपल्या प्रचारात मांडत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सभेमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर भर देण्याचा भाजप-शिवसेनेचा प्रयत्न चुकीचा असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहे.