मुंबई - नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी सत्तास्थापनेवरून युतीत वादाची ठिणगी पडली आहे. विधानसभेच्या निकालांत स्पष्ट बहुमताचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाची गाडी १०५ वर अडकल्याने शिवसेनेने भाजपावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना सत्तास्थानांचे समान वाटप आणि मुख्यमंत्रिपदावर अडली असून, भाजपा ठरल्याप्रमाणे वाजली नाही तर शिवसेनेसमोर सर्व पर्याय खुले असतील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज मातोश्रीवर झाली. यावेळी शिवसेना आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी आगामी सरकारमधील भूमिकेबाबत स्पष्ट मत मांडले. लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची घोषणा करताना सत्तास्थानांच्या समान वाटपावर एकमत झाले होते. त्यामुळे आता भाजपाने शब्द पाळला पाहिजे. त्यावेळी ठरल्या प्रमाणे भाजपा वागली नाही तर आपल्यासमोर सर्व पर्याय खुले असतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक यश न मिळाल्याने शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या लागल्या आहेत.
दरम्यान, निकालांनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तेच्या चढाओढीवरून कुरघोडी सुरू झाली आहे. भाजपा आताही मोठा भाऊ म्हणून समोर आल्यानंतर शिवसेनेला महत्त्वाकांक्षा असलेलं मुख्यमंत्रिपद मिळणं काहीसं अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेनंही आता भाजपावर दबावतंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही हरयाणा आणि महाराष्ट्रातील निकालांची तुलना करत भाजपाला टोला लगावला आहे.