मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी सरकारच्या गडकिल्ले लग्नसमारंभासाठी भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले आहे. तर भाजपमध्ये गेलेले उदयनराजे टीकेचे केंद्रस्थानी आले असून, सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणावर ट्रोल होत आहे.
उदयनराजेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी गडकिल्ले लग्नसमारंभासाठी भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या विषयावर चर्चा केली आहे. सरकारच्या धोरणात किल्ल्यांचा काही भाग लग्न समारंभास भाड्याने द्यावा असं म्हंटले आहे. त्यामुळे मला यामध्ये काहीही चुकीचे वाटत नाही. त्याचप्रमाणे आपण देवळात लग्न लावत नाही का? असा प्रश्न देखील उदयनराजेंनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मिडियावर उदयनराजे भोसले यांच्यावर नेटकरी मोठ्याप्रमाणावर टीका करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे उदयनराजे भोसले यांनीच सरकारच्या निर्णयाचे समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. उदयनराजे भाजपमध्ये गेल्याने त्यांनी आपली भूमिका बदलल्याची टीका सुद्धा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.