मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं आरेतील वृक्षतोडीविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर, लगेचच संध्याकाळी आरेतील झाडं तोडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आरेचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला होता. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात सुनावणी करत तोडकामावर बंदी घातली. मात्र अजूनही हा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. तर 'आरे'ला 'का रे' करण्याची डरकाळी फोडणारे उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसऱ्या मेळावाच्या भाषणात 'आरे'चा साधा उल्लेख सुद्धा केला नाही.
विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आरेतील वृक्षतोड प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. तर वृक्षतोड करण्यास प्रचंड विरोध होत असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेने सुद्धा विरोध केला होता. तर ‘जे नाणारचं झालं तेच आरेचं होणार’ असा इशारा देत, मेट्रोसाठी आरेमध्ये कारशेड कोणत्याही परिस्थितीत शिवसेना होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच यावेळी त्यांनी मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला जाहीरपणे विरोध सुद्धा केला होता.
मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आरेमधील वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली होती. तर 2 हजार 141 झाडे तोडण्यात आली होती. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात सुनावणी करत तोडकामावर बंदी घातली आहे. मात्र पुढे उद्धव ठाकरे यांची भूमिका सुद्धा युती झाल्याने बदलली असल्याचे पहायला मिळाली.
युती होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आरेतील वृक्षतोडीला उघडपणे विरोध केला होता. त्यामुळे दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव ठाकरे हे या मुद्द्यावर बोलतील अशी अपेक्षा असताना, त्यांनी कलम 370 व राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलणे पसंद केले. तर युती झाल्याने भाजप किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी होऊ नयेत म्हणून, शिवसेना आरेतील वृक्षतोडीविरोधात एक पाऊल मागे गेली असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.