- मोसीन शेख
मुंबई – काका- पुतण्याचे राजकरण महाराष्ट्राला काही नवीन नाही. मग राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार असो किंवा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे असो. मात्र वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आपल्या पुतण्यासाठी चक्क पक्षाच्या उमेदवारीचा त्याग केला असल्याचे पहायला मिळाले आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या अभय चिकटगावकर यांनी शुक्रवारी वैजापूर विधानसभा मतदारसंघातून आपल्या काकांच्या म्हणजेचं भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज भरला.
वैजापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि त्यांचे पुतणे अभय पाटील चिकटगावकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी एकाच पक्षातून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे काका-पुतण्याच्या राजकरणाची चांगलीच चर्चा पहायला मिळत होती. मात्र ऐनवेळी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी माघार घेतली असून आपल्या पुतण्यालाच राष्ट्रवादीची उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करत, शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करत अभय चिकटगावकर यांचा उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला आहे.
गेल्यावेळी मोदी लाटेत सुद्धा वैजापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी विजय मिळवला होता. मात्र या विजयाचे खरे शिल्पकार भाऊसाहेब यांचे बंधू व अभय चिकटगावकर यांचे वडील दिवंगत माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर यांना समजले जाते. कैलास चिकटगावकर यांनी त्यावेळी माघार घेत भाऊसाहेब यांना पाठींबा दिला होता.त्यानंतर भाऊसाहेब यांचा विजय झाला होता. त्यामुळे अभय चिकटगावकर यांना संधी देऊन आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आपल्या भावाचे ऋण फेडले असल्याची चर्चा वैजापूर तालुक्यात पाहायला मिळत आहे.
गृहकलामुळे दहा वर्षे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आमच्या कुटंबाने पुन्हा एकत्र येत ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राम जरी वनवासाला गेले असले, तरीही भरताने त्यांच्या पादुका सिहासंवर ठेवूनच राज्य केले आहे. त्यामुळे भाऊसाहेब हे आमच्यासाठी रामचं राहणार. अभय चिकटगावकर (राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार )