सर्वपक्षीय राजकारण्यांना मतदारांनी शिकवला धडा

By बाळकृष्ण परब | Published: October 26, 2019 08:22 PM2019-10-26T20:22:24+5:302019-10-26T20:23:22+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल जवळपास सर्वच राजकीय पक्षांना धडा शिकवून गेला आहे.

Maharashtra Assembly Election 2019 : Voter taught the Lessons to all parties & politicians | सर्वपक्षीय राजकारण्यांना मतदारांनी शिकवला धडा

सर्वपक्षीय राजकारण्यांना मतदारांनी शिकवला धडा

Next

 - बाळकृष्ण परब 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल जवळपास सर्वच राजकीय पक्षांना धडा शिकवून गेला आहे. राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांसह, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांना अशा पक्षांना मतदारांनी काही ना काही स्पष्ट संदेश मतदारांनी दिल आहे. एकीकडे भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी त्यांना मतदारांनी महाजनादेश काही दिला नाही. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अपेक्षेहून अधिक यश पदरात टाकत सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्याचा जनादेश दिला आहे. 


 यंदाच्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने तयारी केली होती. मात्र भाजपाला अतिआत्मविश्वास नडला. काही झाले तरी मतदार आपल्याच पारड्यात मतांचे दान टाकतील ही भाजपाईंची अपेक्षा मतदारांनी फोल ठरवली. राज्यात पुरस्थिती असताना राज्य सरकारने पुरग्रस्तांसाठी फार गांभीर्याने काम केले नाही, असा बनलेला मतप्रवाह, त्यात प्रचारात कलम ३७० चाच झालेला अधिक उल्लेख मतदारांना काही भावला असे दिसत नाही. राज्यातील निवडणुकीत राज्यासंदर्भातील प्रश्नांवरच चर्चा करा, असा संदेश मतदारांच्या कौलामधून स्पष्ट दिसतो. तसेच पुरग्रस्त आणि शेतकरी यांची नाराजीचीही सरकारवर ओढवल्याचे निकालामधून दिसले. त्यामुळे शेतकरी तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारला गांभीर्याने काम करावे लागेल. 

निडणुकीतील निकालांमधून भाजपाप्रमाणेच शिवसेनेलाही फटका बसला. पण भाजपाचे घोडे बहुमतापासून खूप दूरवर अडल्याने शिवसेनेचे उपद्रवमूल्य कमालीचे वाढले आहे. त्यानिमित्ताने २०१४ आणि त्यानंतर भाजपाने केलेल्या दुर्लक्षाचा वचपा काढण्याची शिवसेनेकडे संधी चालून आली आहे. मात्र १२५ जागा लढवूनही शिवसेनेला केवळ ५६ जागा जिंकण्यात यश आले. नाशिक, पुणे, अहमदनगर आदी भागात शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला येत्या काळात पक्षबांधणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच सत्तेत राहून विरोध ही भूमिकाही मतदारांना फारशी पटलेली नाही. त्यामुळे आता सत्ता की विरोधी पक्ष यापैकी एकाची निवड सेनानेतृत्वाला करावी लागेल. 

 ही निवडणूक काँग्रेसला अपयशातही अनपेक्षित यश देऊन गेली. निवडणुकीआधीच खांदे टाकणाऱ्या काँग्रेसच्या झोळीत ४४ जागांचे दान मतदारांनी टाकले. लोकसभेच्या दोन निवडणुकांत दारुण पराभव झाला असला तरी राज्यात काँग्रेसचा जनाधार टिकून आहे. या जनाधाराकडे काँग्रेसने गांभीर्याने पाहावे. तो टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा संदेश मतदारांनी दिला.  

निवडणुकीत पराभव होऊनही ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी चांगलीच फळली म्हणावी लागेल. पक्ष संकटात असताना शरद पवार यांनी केलेल्या झंझावाती प्रचाराला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज जरी राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसावे लागले असले तरी त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आले आहे. तसेच राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादीचे स्थानही भक्कम झाले आहे. 

 गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही मनसेला फारसे यश मिळाले नाही. कल्याण ग्रामीणच्या रूपात एकमेव जागा मिळाली. मात्र मनसेच्या सर्वाधिक आशा असलेल्या नाशिक आणि मुंबईतून पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे हे प्रभावी नेते असले तरी राजकारण अधूनमधून चालवण्याचा विषय नाही तर त्यासाठी सतत कार्यरत राहावे लागेल. मनसेने पक्षविस्तार करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.  

लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या मार्गातील प्रमुख अडसर ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. वंचितला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे येत्या काळात प्रकाश आंबेडकर यांना पक्षाची पुढे वाटचाल करत असताना अधिकाधिक मित्रपक्ष जोडण्याबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : Voter taught the Lessons to all parties & politicians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.