- मोसीन शेख
मुंबई - विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्याने अनेक ठिकाणी उमेदवारांची नाराजी पाहायला मिळाली. तर इच्छुकांच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारी न देणाऱ्या पक्षाच्या विरोधात सोशल नेटवर्किंग साईटसवर देखील मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असल्याचे सुद्धा पहायला मिळत आहे. मात्र पैठण मतदारसंघात माजी आमदार संजय वाघचौरे यांना पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने, एका कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्षांना चक्क स्व:ताच्या रक्ताने पत्र लिहून पाठवल्याचे समोर आले आहे.
पैठण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संजय वाघचौरे यांची उमेदवारी निश्चित समजली जात असताना , ऐनवेळी पक्षाने भाजपमधून आलेले दत्ता गोर्डे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर पक्षाविरोधात नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन करून वाघचौरे यांच्या उमेदवारी न देण्याचा जाब विचारत आहे.
तर पैठणच्या कोलीबोड़खा येथील युवराज चावरे या तरुणांने, संजय वाघचौरे यांना उमेदवारी न मिळाल्याने चक्क आपल्या रक्ताने जयंत पाटील यांना पत्र लिहले आहे. गेल्या 20 वर्षांपासून वाघचौरे यांनी राष्ट्रवादी पक्षाला तालुक्यात जिवंत ठेवेले आहे. मात्र विधानसभेची उमेदवारी देतांना त्यांनाच डावलून, पक्षाने काल प्रवेश केलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असल्याचे चावरे याने पत्रात म्हंटले आहे.
तर, संजय वाघचौरे यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असून, मात्र आज त्यांच्यावरचं पक्षाने अन्याय केला आहे. पक्षश्रेष्ठींच्या शब्दला आदेश समजणाऱ्या नेत्यांवर अन्याय करू नका. अजूनही वेळ गेली नसून लवकरच योग्य निर्णय घ्यावा, यासाठी रक्तरंजित पत्र लिहत असल्याचे या पत्रात युवराज चावरे याने म्हंटले आहे. सोशल मिडियावर हा पत्र व्हायरल झाला आहे.