मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भिवंडी पूर्व मतदारसंघातील मविआचे समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस शेख यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात मुस्लीम आरक्षणासह लव्ह जिहाद समितीची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय सर्व मुस्लिम बांधवांसाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले जावे अशी मागणीही या पत्राद्वारे समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडूनमुस्लीम मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात मुस्लिमांसाठी राखीव बजेट ठेवण्याची मागणी होत आहे. समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे मुस्लिम आरक्षण, १० हजार कोटींचे मुस्लिमांसाठी बजेट ठेवण्याची मागणी करून समाजवादी पक्षाने या मतदारांना मविआकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
महाराष्ट्रात एकूण ३८ मतदारसंघात मुस्लीम मतदारांची निर्णायक संख्या आहेत. राज्यातील एकूण २८८ पैकी ९ मतदारसंघात जवळपास ४० टक्के मुस्लीम, ३८ मतदारसंघात २० टक्क्याहून अधिक मुस्लीम, भिवंडी मतदारसंघात ५० टक्क्याहून अधिक मुस्लीम आहे. याठिकाणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
दरम्यान, जर मुस्लिमांना आरक्षण नसेल तर त्यांना मिळायला हवं. समाजवादी पक्ष ही मागणी सातत्याने करते. सत्ता मिळाल्यावर आम्ही ही तरतूद करू. या देशात मंदिरासाठी बजेट असेल, एखाद्याला जिल्ह्यासाठी बजेट असू शकते. रामनवमीसाठी सरकार वेगळे बजेट ठेवते. दुर्गा जागरणासाठी बजेट ठेवते. सरकार धार्मिक कार्यक्रमांसाठी बजेट ठेवू शकते मग आम्ही माणसांसाठी बोलतोय. त्यात गैर काय...या देशातील अल्पसंख्याकही कर भरतो. ते जर स्वत:साठी मागत असतील तर चुकीचे नाही असं विधान समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मनोज यादव यांनी केले आहे.
मविआच्या जाहीरनाम्यात असणार समावेश? सर्वांचे आपापले विषय, मागणी, शिफारसी, सूचना असतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मागील १ महिन्यापासून जाहीरनामा तयार करण्यासाठी काम सुरू केले आहे. पृथ्वीराज चव्हाण या जाहीरनामा समितीचे प्रमुख आहेत. त्यात समाजवादी पक्षाची शिफारस घेतली गेली. त्यात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याही शिफारशी घेतल्या गेल्यात असं विधान काँग्रेस नेते नसीन खान यांनी केले आहे.