बहिणींना २,१०० रुपये देऊ; तर शेतकऱ्यांना कर्जमाफी, अजित पवार गटाचा मतदारसंघनिहाय जाहीरनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 06:42 AM2024-11-07T06:42:19+5:302024-11-07T06:42:40+5:30
Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाने विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा बुधवारी प्रसिद्ध केला. यामध्ये अकरा नवीन आश्वासने समाविष्ट केली आहेत.
मुंबई - अजित पवार गटाने विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा बुधवारी प्रसिद्ध केला. यामध्ये अकरा नवीन आश्वासने समाविष्ट केली आहेत. पक्ष लढवत असलेल्या सर्व ५२ मतदारसंघांत एकाचवेळी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार, गोंदियामधून खासदार प्रफुल्ल पटेल, नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होते, तर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला.
जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन आहे, तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यात येणार आहे. भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २५ हजार प्रति हेक्टरी बोनस दिला जाणार आहे. शिवाय अडीच लाख नोकऱ्या आणि ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
याशिवाय प्रशिक्षणाद्वारे एक लाख विद्यार्थ्यांना मासिक दहा हजार रुपये स्टायपेंड देणार आहे. अंगणवाडी आणि आशा वर्कर कर्मचाऱ्यांना १५ हजार मासिक वेतन, सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देताना वीज बिल ३० टक्के कमी करण्याचे, तसेच वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला २,१०० रुपये देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात आहे.
विरोधकांच्या ‘नरेटिव्ह’ची किंमत चुकवावी लागली
लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याचा चुकीचा आरोप करत तसा ‘नरेटिव्ह’ पसरवला गेला होता. संविधानाबाबत असे कधीही घडणार नव्हते, घडणार नाही. संविधानाबाबत पंतप्रधानांपासून सर्वांना आदरच आहे. परंतु, त्या ‘नरेटिव्ह’ची मोठी किंमत आम्हाला चुकवावी लागली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली.
एकत्र दिसणार नाही...
मतदानाला १४ दिवस राहिले आहेत. त्यामुळे महायुतीच्या आम्हा तिघा प्रमुख नेत्यांना वेेगवेगळ्या सभांना जावे लागणार आहे. त्यामुळे उद्या आम्ही तिघे एकत्रित दिसणार नाही, त्यावेळी वेगळ्या बातम्या चालवू नका. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती एकोप्याने निवडणुकीला सामाेरी जाणार आहे, असेही पवार म्हणाले.
३६ पानांचा जाहीरनामा
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ३६ पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर ‘महाराष्ट्रवादी घोषणापत्र’ असे छापण्यात आले आहे.