मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास महिलांना दरमहा ३ हजार रुपये आणि बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये देण्याची घोषणा करीत मविआने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते बुधवारी आपल्या प्रचाराचा नारळ मुंबईत फोडला. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेत पाच महत्त्वाच्या घोषणा असणारे ‘गॅरंटी कार्ड’ आघाडीने जाहीर केले.
देशात सध्या विचारधारेची लढाई सुरू आहे. एकीकडे डॉ. आंबेडकरांचे संविधान, एकता, सन्मान आणि दुसरीकडे लपूनछपून संविधानाला कमजोर करण्याचे काम करणारे भाजप, आरएसएस यांच्यातील ही लढाई आहे. पण, संविधानाला कुणीही संपवू शकत नाही. स्वाभिमानी जनता यासाठी इंडिया आघाडीच्या पाठिशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. नागपूरमध्ये सकाळी संविधान संमेलनात बोलताना त्यांनी आपले हक्क व अधिकारांपासून वंचित राहिलेल्या ९० टक्के भारतीयांना न्याय मिळवून देण्यास जातगणना होणारच, आरक्षणाची ५०% ची भिंतही तोडणार, असा निर्धार बोलून दाखविला.
राहुल गांधी म्हणाले... संविधान कुणीही संपवू शकत नाही- मुंबई, महाराष्ट्र जाणतो धारावीची एक लाख करोड रुपये किमतीची जमीन, तुमची गरिबांची आहे. पण, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्याकडून ती काढून घेतली जात आहे आणि ती एका अब्जाधीशाला दिली जात आहे.- राज्यातील सेमी कंडक्टर प्रकल्प, टाटा एरअबस, गेल पेट्रोकेमिकल, आयफोन प्रकल्प तुमचे होते, ते एकापाठोपाठ एक हिसकावून भाजपने गुजरातला नेले.- मोदी, भाजपच्या धोरणांनी बेरोजगारी वाढवली आहे. लहान आणि मध्यम उद्योजकांना यांनी एकामागून एक संपवले आहे. रोजगार अदानी, अंबानी देऊ शकत नाही.- संविधान संपले तर या देशातील दलित, आदिवासी, गरिबांच्या हातात काहीच राहणार नाही. तुमच्या हक्कांचे रक्षण संविधान करते. संविधान हे केवळ पुस्तक नाही, तर या पुस्तकात महापुरुषांचे विचार, देशाचा आवाज आहे.- यात आंबेडकर, फुले, गांधीजी, बसवन्नाजी, नारायण गुरु, भगवान बुद्ध यांचा आवाज आहे. गरीब, मागासवर्ग, शेतकरी, दलित, आदिवासी, युवा यांचा आवाज यात आहे. - हळूहळू मोदी, भाजप आरएसएस या संविधानाला संपवण्याचे काम करत आहे. आम्ही सांगतो, संविधानाला कुणीही संपवू शकत नाही, असा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेस गॅरंटी पूर्ण करणारा पक्ष : खरगेआम्ही महिलांना कर्नाटक, तेलंगनामध्ये दरमहा पैसे देतो, इथे आम्ही ३ हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. पण मोदींनी मागील दहा वर्षात एकही गॅरंटी पूर्ण केली नाही. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात आम्ही दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या, असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला.
५ जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार : ठाकरे राज्यातील जनतेला सर्व प्रकारचे कर लावून महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचून आम्ही पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर कायम स्थिर ठेवणार आहोत. तसेच महिलांसाठी असलेल्या योजनेत अधिक भर घालू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्ज माफ : शरद पवारमहाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये परतावा दिला जाईल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.