महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 03:44 PM2024-11-14T15:44:01+5:302024-11-14T15:45:14+5:30

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यातील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतात. महाराष्ट्रात जवळपास ४० लाख उत्तर भारतीय मते आहेत जे वेगवेगळ्या मतदारसंघात विभागले गेले आहेत

Maharashtra Assembly Election 2024 - 40 Lakh North Indian voters in Maharashtra battleground; Decisive vote on 22 seats in Mumbai | महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते

महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान काही दिवसांवर आलं आहे. त्यामुळे प्रचाराची रंगत वाढली आहे. महायुती, महाविकास आघाडी प्रत्येक पक्ष मतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यात महाराष्ट्रातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या वाढली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ही मते मिळवण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वात महायुती आणि काँग्रेस नेतृत्वातील महाविकास आघाडीसह घटक पक्षांनी उत्तर भारतीय चेहरे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहेत. मुंबईतील जागांवर सर्वाधिक उत्तर भारतीय उमेदवार नशीब आजमवत आहेत. 

जवळपास १४ उत्तर भारतीय उमेदवार विविध पक्षांकडून मुंबईत निवडणूक लढवत आहेत. ज्यात काही जागांवर उत्तर भारतीय विरुद्ध उत्तर भारतीय अशी थेट लढत आहे. नवी मुंबई, मालेगाव, औरंगाबाद, भिवंडीसारख्या भागातही उत्तर भारतीय नेते निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. भाजपाने त्यांचा सुरक्षित गड मानला जाणाऱ्या बोरिवली विधानसभेत उत्तर भारतीय नेते संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय वसईत स्नेहा दुबे पंडित यांना भाजपाने तिकिट दिले आहे. कलिना विधानसभा मतदारसंघात रामदास आठवले यांनी उत्तर भारतीय नेते अमरजित सिंह यांना उमेदवारी दिली आहे. गोरेगाव विधानसभेत भाजपाने विद्या ठाकूर यांना तिसऱ्यांदा तिकिट दिले आहे. 

भाजपाचा मित्रपक्ष शिवसेना यांनी दिंडोशी मतदारसंघात माजी खासदार संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही उत्तर भारतीय उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसनं चारकोप येथील मतदारसंघात उत्तर भारतीय नेते यशवंत सिंह यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी भाजपाचे योगेश सागर आणि मनसेचे दिनेश साळवी यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. नालासोपारा मतदारसंघात संदीप पांडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. अणुशक्तीनगर जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सना मलिक तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फहाद अहमद यांना उमेदवार बनवले आहे. मानखुर्द शिवाजीनगर येथे समाजवादी पक्षाने अबु आझमी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना तिकिट दिले आहे. वांद्रे पूर्व येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी निवडणुकीत उभे आहेत.

उत्तर भारतीय मते कुणाला?

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यातील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतात. महाराष्ट्रात जवळपास ४० लाख उत्तर भारतीय मते आहेत जे वेगवेगळ्या मतदारसंघात विभागले गेले आहेत. मुंबईतील ३६ पैकी २२ मतदारसंघात उत्तर भारतीय मते निर्णायक आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमधील १८ लाख स्थलांतरित आता मुंबईचे मतदार बनले आहेत. कलिना, कुर्ला, दहिसर, चारकोप, कांदिवली पूर्व, बोरिवली, मागाठणे, वर्सोवा, गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व यासह शहरातील विविध मतदारसंघात त्यांचे प्रभावी मतदान आहे. 

मुंबईनंतर नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर, कोल्हापूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथेही उत्तर भारतीय मतदार आहेत. रोजगारासाठी बहुतांश उत्तर भारतीय महाराष्ट्रात स्थलांतरित झाला आहे. हे मतदार स्थानिक मुद्द्यांऐवजी राष्ट्रीय पक्षांना पसंती देतात. कृपाशंकर सिंह, संजय निरुपम, राजहंस सिंह यासारख्या उत्तर भारतीय नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपाला साथ दिली. त्यामुळे मोठा मतदार भाजपाकडे वळला. आता काँग्रेसमध्ये नसीम खान, उद्धव ठाकरे गटाकडून आनंद दुबे यासारखे उत्तर भारतीय चेहरे पुढे येत आहेत. 
 

 

 

Read in English

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - 40 Lakh North Indian voters in Maharashtra battleground; Decisive vote on 22 seats in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.