Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : पहिली आणि दुसरी यादी मिळून भाजपने विधानसभेच्या विद्यमान ८८ आमदारांना तिकीट दिले आहे. तसेच, चार विधानपरिषद सदस्यांनाही निवडणूक रिंगणात उतरवून विधानसभेत जाण्याची संधी देण्यात आली आहे. २२ उमेदवारांची दुसरी यादी भाजपने शनिवारी जाहीर केली. त्यात सात विधानसभा आणि दोन विधानपरिषद सदस्य अशा ९ विद्यमान आमदारांना तिकीट मिळाले आहे. दोन्ही याद्या मिळून पक्षाने १२१ उमेदवार जाहीर केले आहेत.
नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचे नाव पहिल्या यादीत नव्हते; पण अखेर त्यांना संधी देण्यात आली. प्रकाश भारसाकळे (अकोट), रविशेठ पाटील (पेण), भीमराव तापकीर (खडकवासला), सुनील कांबळे (पुणे कॅन्टोन्मेंट), समाधान आवताडे (पंढरपूर), कुमार आयलानी (उल्हासनगर) हेही प्रतीक्षेत होते; पण त्यांनाही अखेर संधी मिळाली. वाशिममध्ये लखन मलिक व गडचिरोलीत देवराव होळी या विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला.
पराभूतावर विश्वास आणि निष्ठावंताला संधीसांगलीच्या शिराळाचे उमेदवार सत्यजित देशमुख हे विधानपरिषदेचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत. मलकापूरमध्ये २०१९ मध्ये पराभूत झालेले चैनसुख संचेती यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास टाकला आहे. अकोटमधून उमेदवारी मिळालेले प्रकाश भारसाकळे हे आतापर्यंत सातवेळा आमदार झाले आहेत.अकोला पश्चिममधून उमेदवारी मिळालेले विजय अग्रवाल हे महापौर राहिले आहेत. या ठिकाणी दीर्घकाळ आमदार राहिलेले गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर आता त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा असताना जुने निष्ठावंत अग्रवाल यांना संधी देण्यात आली.
वेटिंगवर असलेले आमदार : १) हरिष पिंपळे - मुर्तिजापूर २) दादाराव केचे - आर्वी, ३) विकास कुंभारे - मध्य नागपूर ४) डॉ.संदीप धुर्वे - आर्णी ५) नामदेव ससाणे - उमरखेड ६) सुनील राणे - बोरीवली ७) भारती लव्हेकर - वर्सोवा ८) पराग शाह - घाटकोपर पूर्व ९) माळशिरस - राम सातपुते १०) लक्ष्मण पवार - गेवराई (पवार यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.)
शिंदेसेनेत प्रवेश; पण जागा भाजपकडे गेली अन् तिकीट हुकले...मेळघाटचे ‘प्रहार’चे आमदार राजकुमार पटेल यांनी अलीकडेच शिंदेसेनेत प्रवेश केला होता; पण ही जागा भाजपकडे गेली आणि उमेदवारी काळेंना मिळाली.वरोरा (जि. चंद्रपूर) येथून उमेदवारी मिळालेले करण देवतळे हे माजी मंत्री दिवंगत संजय देवतळे यांचे पुत्र आहेत.मेळघाटचे उमेदवार केवलराम काळे पूर्वी काँग्रेसचे आमदार होतेे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये गेले.धुळे ग्रामीणमधील उमेदवार राम भदाणे हे माजी आमदार द. वा. पाटील यांचे नातू आहेत.विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर व रमेश कराड यांना विधानसभेच्या रिंगणात उतरविले.चंद्रशेखर बावनकुळे आणि राम शिंदे या दोन विधानपरिषद सदस्यांना उमेदवारी आधीच देण्यात आली आहे.