सातारा - विधानसभेच्या आमदारकीपासून देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत निवडणूक लढवून चर्चेत असणारे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले चौथ्यांदा सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत. मी स्वयंभू असून जनतेनं आता जागरूक होण्याची गरज आहे असं सांगत अभिजीत बिचुकले यांनी महायुतीतील भाजपा उमेदवार छत्रपती शिवेंद्रराजे यांच्यावर निशाणा साधला.
अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं की, सातारा जावळी मतदारसंघातील लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे, मी स्वत: या मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणुकीला उभा राहतोय. या तालुक्याचा विकास काय झाला याचं आत्मचिंतन करावे. राजकारणात काहीही होत असलं, अस्थिरता असली तरी अभिजीत बिचुकले जेव्हा उभा राहतो तेव्हा तो माघार घेत नाही हे लक्षात ठेवा. हे चाललंय, ते जनतेच्या सेवेसाठी..मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस म्हणून या देशात, सातासमुद्रापार माझं नाव नेले. माझा स्वभाव सडेतोड आहे तसा इथल्या आमदाराचा आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच इथले जे विद्यमान आमदार आहेत ते कुणासाठी काम करतात तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांसाठी काम करतात. ही गोष्ट आत्मपरिक्षण करण्याची आहे. तुम्ही स्वत:ला छत्रपतींचे वारसदार म्हणता आणि चहावाले नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम करता. फडणवीस नागपूरमध्ये मतांची भीक मागायला जनतेपुढे फिरणार आहेत. अभिजीत बिचुकले हा स्वयंभू आहे, जनतेनं जागरूक व्हावं. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे तुमचं मत कुठे विकू नका. खरोखर इतिहास घडवायचा असेल, साताऱ्याचं नाव विधानसभेत गाजवायचं असेल तर माझा विजय तुम्ही निश्चित करा असं आवाहन अभिजीत बिचुकले यांनी लोकांना केले आहे.
दरम्यान, मी लोकशाही मानतो. २००४ सालापासून विद्यमान आमदार आणि मी सातत्याने एकमेकांविरोधात निवडणूक लढतोय. ही माझी चौथी टर्म आहे. त्यामुळे सातारा जावळी मतदारसंघातील लोकांनी जागरूक व्हावे. मी निवडून आल्यानंतर विधानभवनात साताऱ्याचा झेंडा फडकेल. मी कुणाचे तळवे चाटत नाही अशा शब्दात अभिजीत बिचुकले यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढण्याचा निर्धार केला असून आज त्यांनी सातारा जावळी मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला.