Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून बॅग तपासण्यात आली आहे. यवतमाळच्या वणी विमानतळावर उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या आयोगाच्या कारवाईवरुन रोष व्यक्त केला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही या कारवाईवरुन शंका उपस्थित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या बॅग का तपासल्या नाही जात असा सवाल सुषमा अंधारेंनी केलाय.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय देरकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सोमवारी वणीत दाखल झाले होते. हेलिकॉप्टरमधून उतरताच माजी मुख्यमंत्री ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली. या तपासणीचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंनी काढला आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे यांनीही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईवरुन टीका केली. विधानसभेची निवडणूक निष्पक्ष वातावरणात संपन्न होतील याची खात्री नसल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
"महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांची पदमुक्ती ही आम्हाला दिलासादायक बाब वाटली होती. महाराष्ट्रातील निवडणुका निर्भय वातावरणात संपन्न होणार आहेत असे आम्हाला वाटत होतं. आम्ही कायद्याचा सन्मान करणारी माणसं आहोत. त्यामुळे निवडणूक काळात बॅगा तपासल्या जात असतील गाड्या तपासल्या जात असतील तर त्या कृतीचा निश्चितपणे सन्मान केला पाहिजे आणि त्यासाठी सहकार्य केले पाहिजे. जर तुम्ही आमच्या बॅगा तपासणार असाल तर कायद्यासमोर सगळे समान आहेत. मग अशाच पद्धतीने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या बॅग का तपासल्या जाऊ नयेत," असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
"तुम्हाला आमच्या बॅग तपासायच्या आहेत तर तपासा आम्ही त्याला सहकार्य करु. पण इतरांच्या बॅग का तपासल्या जात नाहीत. हा पक्षपातीपणा निवडणूक आयोगाकडून का व्हावा. कारण तुम्ही ज्यांची बॅग तपासली आहे ही ती व्यक्ती या राज्यातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे. महाराष्ट्रातील एका प्रतिष्ठित व्यक्तीची बॅग तुम्ही तपासायला घेता त्यावेळी निश्चितपणे तुम्ही एका पक्षप्रमुखासोबत त्यांना मानणाऱ्या लोकांचाही अपमान करता. आम्हाला या आपल्या प्रक्रियेतून एका वेगळ्याच गोष्टीचा वास येत आहे. ज्या अर्थी तुम्ही फक्त उद्धव ठाकरे यांची बॅक तपासता त्याअर्थी येणाऱ्या काळातील निवडणुका अजिबात निष्पक्ष वातावरणात संपन्न होतील याची आम्हाला खात्री वाटत नाही," असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे - खासदार अमोल कोल्हे
"आज पुन्हा बॅग तपासली गेली, विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे साहेबांचीही तपासणी झाली. नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे," असं खासदार अमोल कोल्हेंनी म्हटलं.