Ashok Chavan on Batenge Toh Katenge : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे विरोधकांकडून या घोषणेचा विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून महायुतीच्या नेत्यांपर्यंत सर्वच जण अशा प्रकारच्या घोषणा देत आहेत. असं असताना दुसरीकडे महायुतीचे काही नेते या घोषणेपासून स्वतःला दूर ठेवत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, आता माजी मुख्यमंत्री आणि काही काळापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांनीही ही घोषणा विनाकारण देण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा पूर्णपणे अप्रासंगिक असून महाराष्ट्रातील जनतेला ती आवडणार नाही, असे भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. या घोषणेचा फारसा निवडणुकीशी संबंध नाही. निवडणुकीच्या काळात घोषणाबाजी केली जाते. पण ही विशिष्ट घोषणा चांगली नाही आणि ती लोकांना आवडेल असे मला वाटत नाही. व्यक्तिशः मी अशा घोषणांच्या विरोधात आहे कारण हे समाजासाठी अजिबात चांगले नाही. यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, हे पाहावे लागेल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
"मी माझ्या कामावर विश्वास ठेवतो. मी सेक्युलर आहे. मी भाजपमध्ये असलो तरीही मी सेक्युलर हिंदू आहे. मी मला हिंदुत्वावपासून वेगळं केलेलं नाही. पण मी सेक्युलर हिंदू आहे. संविधानही हेच सांगतं. भाजपमध्ये ही विचारधारा आहे की आम्ही हिंदू आहोत पण तरीही भाजपमध्ये सेक्युलर असूनही हिंदुत्व मानणारेही लोक आहेत," असंही अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान, याआधी भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनीही 'बटेंगे तो कटेंगे' अशा घोषणांची महाराष्ट्राला गरज नाही, असे म्हटलं आहे. "आपण एकाच पक्षाचे आहोत म्हणून मी त्याचे समर्थन करू शकत नाही. माझा विश्वास आहे की विकास हाच खरा मुद्दा आहे. या पृथ्वीतलावर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आपला मानणे हे नेत्याचे काम असते. असे विषय महाराष्ट्रात आणू नयेत. विविध राजकीय परिस्थिती असलेल्या यूपीच्या संदर्भात योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले होते. त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही," असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.