छत्रपती संभाजीनगर - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे ९ दिवस उरलेत. त्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. व्होट जिहादवरून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर तोफ डागली. त्याला एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या पूर्वजांनी इंग्रजांविरोधात लढण्याऐवजी त्यांना जेलमध्ये बसून प्रेम पत्र लिहिले होते. व्होट जिहाद, धर्मयुद्ध या शब्दांवर आक्षेप न घेतल्याबद्दल ओवैसी यांनी निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे MIM उमेदवार इम्तियाज जलील आणि नासिर सिद्दीकी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत औवेसी यावेळी म्हणाले की, ये देवेंद्र फडणवीस, तू लक्षात ठेव तू माझ्या बोलण्याला आव्हान देऊ शकत नाही, मोदी-शाह आणि तू आले तरी मला आव्हान देऊ शकत नाही. आज तुम्ही जिहाद बोलता, भाजपाच्या उमेदवाराला मत मिळाले नाही तर फडणवीस व्होट जिहाद बोलतात. फडणवीसांचं हे विधान आचारसंहितेत बसते का हा माझा निवडणूक आयोगाला सवाल आहे, हे आचारसंहितेचे उल्लंघन नाही का, धर्मयुद्ध आणि जिहाद कुठून आले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच पंतप्रधानांचा एक है तौ सेफ है हा नारा विविधतेच्या भावनेविरोधात आहे. २० तारखेला आकाशात पतंग दिसणार आहे. इंसाफ है तो इंडिया सेफ है, संविधान असेल तर सन्मान असेल. आंबेडकर जिवंत आहेत तर गोडसे मृत आहेत. मोदी महाराष्ट्राच्या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी करतायेत. एकाच्या नावावर हे सगळ्यांना लढवत आहेत असा आरोपही ओवौसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला.
दरम्यान, वक्फ कायदा बनला तर तो मशीद हिसकावून घेईल. हा कायदा बनला तर दर्गा हिसकावेल, इतकं वाईट विधेयक हे बनवले गेले आहे. भारताच्या संसदेत जर तुमचा आवाज असता, इम्तियाज आणि ईमान यशस्वी झाले असते तर कोणाचा फायदा झाला असता, तुमचा झाला असता, संविधानाचा झाला असता, समाजाचा झाला असता. वक्फ विधेयक भारताच्या संसदेत आणले गेले. या कायद्याविरोधात तुम्हाला आणि आम्हाला उभं राहावे लागेल. हे विधेयक जर केंद्र सरकारने आणले तर जितका विरोध CAA साठी झाला त्याहून दुप्पट विरोध संपूर्ण भारतात होईल. हे विधेयक आम्ही मानत नाही असा इशाराही असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपाला दिला.