छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्रात निवडणुकीच्या रणांगणात 'बटोगे तो कटोगे' असा योगी आदित्यनाथ यांचा नारा चर्चेत आला आहे. मात्र योगींच्या या घोषणेवरून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी जोरदार पलटवार केला. बटोगे तो कटोगे असा नारा योगींनी दिला, पण बीफच्या नावाखाली, मॉब लिचिंगच्या नावावर, घरवापसी, डोक्यावर टोपी घातल्यामुळे, दाढी वाढवल्यामुळे जर तुम्ही कापत आहात. तर हा तुमचा द्वेष देशाला कमकुवत करत नाही का याचे उत्तर मला द्या असं अकबरुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभेत ते बोलत होते.
अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले की, योगींचे हे विधान हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणे म्हणजे देशाला कमकुवत करण्यासारखं नाही का...? मी अकबरुद्दीन औवेसी मुसलमान, या देशात भाडेकरू नाही. मोदी-योगी हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचा आहे. हिंदुस्तान ना तुमची जाहागिरी आहे ना माझी...हिंदुस्तान हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई, पारसी प्रत्येक धर्मातील माणसाचा आहे. कुणा एकाचा नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच आज देशातील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी, महागाई, प्रत्येक २-३ मिनिटाला होणारे बलात्कार, पदवीधरांना नोकऱ्या, कमकुवत अर्थव्यवस्थेला चालना देणे, पेट्रोल डिझेल गॅसचे दर कमी करणे, रुपयाचा घसरता दर कमी करणे हे आहे. आज देशात बेघरांना घरे दिली जातायेत का, रोजगार दिले जातायेत का? हे काही होत नाही. केवळ धर्माच्या नावाखाली देशाचं विभाजन करण्याचं काम करत आहेत. जातीपातीचं राजकारण करू नका बोलणारे धर्माचं राजकारण करू नका ही गोष्ट का बोलत नाहीत असा सवाल अकबरुद्दीन ओवैसी यांनी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना विचारला.
औरंगाबाद आमचं होतं, आहे अन् राहणार
महाराष्ट्रात मराठवाडा सर्वात मागासलेला भाग आहे. मी मराठा बोलतो, तेव्हा केवळ हिंदू मराठा नसतो, तर मुस्लीम मराठा, दलित मराठा मराठवाड्यात राहणारा प्रत्येकजण मराठा आहेत. ३० वर्षापूर्वी मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बनवलं गेले, कागदावर आहे पण पैसे नाहीत. मराठा आरक्षणासह मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला आम्ही ५० हजार कोटींचं पॅकेज देऊन मराठवाड्याला पुढे आणू. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करतायेत. पाण्यासाठी वणवण भटकतायेत. दवाखाने नाहीत. १००-२०० किमी रुग्णालयात जाण्यासाठी लागतात. सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मराठवाड्यात नाही. नाव बदलल्याने काम मिळणार का, अन्न मिळणार का, पाण्याची तहान भागणार का, आजारपण दूर होणार का? अरे नावात काय ठेवले. बेईमानींनी काम दाखवावं असं सांगत अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद आमचं होतं, आमचं आहे अन् आमचेच राहणार असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला.
दरम्यान, योगी येणार आहेत असं मला सांगितले गेले. "योगी तेरे आने का बाद अकबरभी आयेगा, मोदी तेरे आने का बाद अकबर भी आयेगा" २० तारखेला पतंग उडवणार आहे. १० वर्षांनी मी आज आलोय पण जोश आजही तेवढाच आहे. घड्याळात ९.४५ वाजलेत, १० वाजता प्रचार संपणार आहे, मात्र अजून १५ मिनिटे बाकी आहेत असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणताच उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केला. त्यात १५ मिनिटे बाकी आहेत, जरा धीर धरा, ना ते माझा पाठलाग सोडणार आणि मी त्यांचा पाठलाग सोडणार असं सांगत अकबरुद्दीन यांनी मागील सभेत केलेले १५ मिनिटांच्या वादग्रस्त विधानाची आठवण करून दिली.