"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 05:09 PM2024-11-06T17:09:29+5:302024-11-06T17:20:18+5:30
राज ठाकरेंच्या टीकेला आता उपमुख्यंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Ajit Pawar Slams Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेतून महायुती आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला होता. शिवसेना आणि धनुष्यबाणावरील मालकी संदर्भावरूनही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेवर टीकास्त्र डागलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करत अजित पवार यांच्यावर घणाघात केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांची प्रॉपर्टी नाही असं म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या टीकेला आता उपमुख्यंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाण्यातल्या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि अजित पवारांवर निशाणा साधला होता. शिवसेना ही काही शिंदेंची किंवा उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं. यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख करत अजित पवार यांच्यावरही राज ठाकरेंनी टीका केली होती. राज ठाकरे यांच्या पक्ष आणि चिन्हावरील वक्तव्यावरुन अजित पवारांनी भाष्य केलं आहे. कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही, म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार इंदापुरातून बोलत होते.
"काहीजण म्हणतात अमुक चोरलं तमुक चोरलं. कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही. त्यामध्ये आमदार महत्त्वाचे असतात. संघटना, संघटनेतील जिल्हाध्यक्ष महत्त्वाचे असतात. संघटनेतील कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. त्यांच्यावर संघटना चालत असते. संघटना कुणा एकाच्या मालकीची नसते. काल कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर आरोप करत होते. राज ठाकरे तर कधी काय बोलतील सांगता येत नाही. मध्येच म्हणतात अजित पवार जातीवाद करत नाहीत. त्यामुळे त्या गोष्टीकडे फार महत्त्व देऊ नका," असा पलटवार अजित पवारांनी केला आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
"शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माझे शरद पवारांच्या भूमिकांबद्दल मतभेद आहेत, पण तरीही एक गोष्ट सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे ती अजित पवारांची नाही," असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं.