अमरावती : सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अमरावती मतदारसंघातून सुलभा खोडके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिली आहे. मात्र, बडनेरा विधानसभेचे आमदार आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांनी सुलभा खोडके यांच्याबद्दल एक विधान केले आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.
एका सभेत बोलताना रवी राणा यांनी अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही, असे विधान सुलभा खोडके यांच्याबद्दल केले होते. रवी राणा यांनी केलेले हे विधान सध्या चर्चेत आले आहे. यावरून अजित पवारांनी रवी राणा यांना फटकारले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना समज द्यावी, असा सल्लाही दिला आहे. आज (दि.१२) अजित पवार अमरावतीमध्ये आले असता त्यांना याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा, त्यांनी आपली प्रतिक्रिया देत यावर भाष्य केले.
अजित पवार म्हणाले, "रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी असल्या सारखे आहेत. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. किंबहुना स्वतःच्या बोलण्यातून ते त्यांच्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत ठरले आहेत. शेवटी लोक बोलत असतात, आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं. लोकांना फार नकारात्मक बोलेलं आवडत नाही. जनता सकारात्मक विचार करत असते."
याचबरोबर, "आम्ही रवी राणा यांना दोनवेळा विधानसभेला पाठिंबा दिला आहे. मात्र, आमचा उमेदवार चांगला मताधिक्यानं विजयी करण्याचा प्रयत्न करत आहे. तो विजयी होणार आहे. तसेच, आनंदराव अडसूळ हे सुद्धा मला भेटले होते. त्यांनीही रवी राणा हे आपल्या विरोधात काम करतात,’ असे त्यांनी सांगितले. हे बरोबर नाही. देवेंद्र फडणवीसांनी रवी राणांना समजावून सांगितलं पाहिजे. महायुतीत अंतर पडणार नाही, अशी काळजी घेतली पाहिजे," असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.