अजित पवार यांनी व्यक्त केली मुख्यमंत्रिपदाची इच्छा, फडणवीसांची थोडक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 05:55 PM2024-09-26T17:55:01+5:302024-09-26T17:55:32+5:30

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाबाबतची आपली इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Ajit Pawar expressed his desire for Chief Ministership, Fadnavis' brief reaction, said...   | अजित पवार यांनी व्यक्त केली मुख्यमंत्रिपदाची इच्छा, फडणवीसांची थोडक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...  

अजित पवार यांनी व्यक्त केली मुख्यमंत्रिपदाची इच्छा, फडणवीसांची थोडक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...  

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजायला आता काही दिवसच उरले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि मुख्य विरोधी पक्षांची महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होणार आहे हे जवळपास निश्चित आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणती समिकरणं आकारास येतील हे सध्यातरी कुणीही ठामपणे सांगू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. दरम्यान, काल इंडिया टु़डे कॉन्क्लेव्हमध्ये अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतची आपली इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या पक्षाचा एक आमदार असतो, त्या नेत्याचीही मुख्यमंत्री बनण्याची इच्छा असते, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

यावेळी राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आल्यास कोण मुख्यमंत्री बनणार असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रश्नाचं उत्तर देण्यास मी उत्तरदायी नाही. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. ते त्यांच्या पक्षाची भूमिका सांगू शकतात. मात्र मी महाराष्ट्र भाजपाचा एक नेता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, आमच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय संसदीय मंडळाकडून घेतला जातो, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच रोटेशनल मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता असं काही होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला केवळ १२६ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती. आधीचा रेकॉर्ड पाहिल्यास विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मतांची संख्या घटत असल्याचं दिसून येतं. हाच ट्रेंड राहिल्यास महायुती अडचणीत आहे, अशी विचारणा केली केली असता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष आणि महायुती सर्वात मोठी आघाडी म्हणून सत्तेवर येईल. आम्ही येथे पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करू, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अजित पवार यांना सोबत घेणं आमच्या मतदारांना आवडलेलं नाही, अशी कबुलीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की,  "मी इतकंच सांगेन की हो... मी ही गोष्ट मान्य करतो की, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला जेव्हा सोबत घेतले. ते आमच्या मतदारांना आवडलं नाही. अजिबात आवडलं नाही. पण, आम्ही  ते जेव्हा आमच्यासोबत आले, ते कोणत्या परिस्थितीत आले. कोणत्या परिस्थिती त्यांना सोबत घ्यावे लागले, हे त्यांच्यासमोर मांडले. तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले आहे की, राजकारणात अनेकदा अशी परिस्थिती येते, जेव्हा तडजोड करावी लागते." असेही ते म्हणाले.   

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Ajit Pawar expressed his desire for Chief Ministership, Fadnavis' brief reaction, said...  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.