गौतम अदानींबाबतच्या 'त्या' विधानावरुन अजित पवारांचा युटर्न; म्हणाले, "त्यांचा राजकारणाशी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 10:32 PM2024-11-13T22:32:27+5:302024-11-13T22:55:28+5:30
Ajit Pawar On Gautam Adani : गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचाही संबंध नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २४ तासांमध्येच गौतम अदानींबाबत केलेल्या वक्तव्यावरून घुमजाव केलं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सरकारच्या स्थापनेसाठी झालेल्या बैठकीत गौतम अदानी हजर होते, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला होता. त्यानंतर आता गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचाही संबंध नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या या युटर्नची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.
जपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील बैठकांमध्ये गौतम अदानी यांचाही सहभाग होता असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत सांगताना अजित पवारांनी एका मुलाखतीत बोलताना हे विधान केलं. अजित पवार यांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र आता अदानींचा राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा होऊ लागल्याने त्यांनी युटर्न घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या युतीसाठी पाच बैठका झाल्या होत्या. मी पुन्हा सांगतो अमित शाह, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार या बैठकीला होते. या बैठकीत भाजपत जाण्यासाठी चर्चा झाली होती. सर्व ठरलं होतं. पण त्या घटनेची जबाबादारी माझ्यावर आली आहे. ती जबाबदारी घेतली आहे. बाकी सर्वांना मी सुरक्षित केलं आहे,” असं अजित पवार यांनी मुलाखतीदरम्यान, म्हटलं होतं.
गौतम अदानींबाबत केलेल्या या खुलाशांतर त्यांना याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार यांनी नव्हते एवढंच उत्तर दिलं होतं. त्यानंतर बीडमध्ये बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिलं. गौतम अदानी यांच्याबाबत मी केलेल्या वक्तव्याचा ध चा मा केला जात आहे. त्यांचा राजकारणाचा काडीमात्र संबंध नाही, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.
मी अनेक उद्योगपतींच्या घरी जातो - शरद पवार
"गौतम अदानी नव्हे तर मी अनेकांच्या घरी जातो. रतन टाटा असो वा किर्लोस्कर यांच्याही घरी जातो. आजही जातो. अदानी यांची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आहे. आणखी काही प्रकल्प काढण्याचा अदानींचा विचार आहे. महाराष्ट्रातील त्यांची गुंतवणूक जेव्हा मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा गोंदिया भंडारा परिसरात त्यांनी प्रकल्प सुरू केले त्याचे उद्घाटन मीच केले होते. त्या भागात कोळशाच्या खाणी विकसित करण्याचा विचार होता. त्यात त्यांनी लक्ष घातलं. केंद्र सरकारने ते काम त्यांना दिले. त्यावेळी भाजप सरकार नव्हते. ते काम त्यांनी पूर्ण केले. त्याचे काही कार्यक्रम होते तेव्हा मी स्वत: गोंदियाला गेलो होतो. त्यामुळे जे महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात काम करू इच्छितात अशांच्या कामांना गती देणे, त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे या गोष्टी राज्य म्हणून गरजेच्या असतात," असं शरद पवार यांनी म्हटलं.
"अजित पवारांनी सांगितलेली एकही गोष्ट सत्य नाही. निवडणुकीचा कालावधी सोडल्यानंतर कधीही केंद्रातले मंत्री असो वा उद्योजक भेटत नाहीत असं मी कधी म्हणणार नाही. अनेकवेळा अजित पवारांना सोबत घेऊन मी अनेकदा भेटी घेतल्या जेणेकरून त्यांना माहिती व्हावी. देशाचे गृहमंत्री यांना मी एकदा काय, ३-४ वेळा भेटलो असेल. शिष्टमंडळ घेऊन भेटलोय. संवाद ठेवणे, भेट घेणे यातून काही कारस्थान होतंय असं म्हणण्यात काही अर्थ नाही," असंही शरद पवार म्हणाले.