तासगाव - मी शब्दांना पक्का आहे, १९९९ साली आबांना निवडून आणण्यासाठी संजयकाका पाटलांना निवडणूक न लढवण्याचं सांगितले होते. आर.आर पाटलांना मी नेहमीच मदत केली, पाठीशी उभा राहिलो असं सांगत अजित पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा आयोजित केला होता. त्यात ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, सगळ्यात जास्त वेळा राज्यात गृहमंत्रिपदी आर.आर पाटील राहिलेत. माझ्या नेत्यांना मी अनेकदा सांगायचो, मला एकदा गृहमंत्री पद द्या मग बघतोस एकाएकाला...चांगला कारभार करायचा. मला वेडेवाकडे खपत नाही. सगळ्यांना न्याय आम्हाला द्यायचा आहे. मी या सरकारमध्ये आहे त्यामुळे कुठल्याही अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ देणार नाही. आर.आर गेल्यानंतर स्मिता पाटील हिच्या लग्नाला मी उभं होतो. लग्न मी जमवलं, मी उपकार केले नाहीत. माझ्या सहकाऱ्याच्या मुलीसाठी केले. आज तासगावात काय कामे झाली. मी १९९९ साली साताराचा पालकमंत्री होतो, तेव्हा संजयकाकाला बोलावले. मी शब्दाचा पक्का आहे, तुम्ही यावेळी आर.आर विरोधात अर्ज भरू नको, तू फॉर्म भरला तर आबा पडतील. संजयकाकाने ऐकले, उभा राहिला नाही. मग मी संजयकाकाला ६ वर्षासाठी आमदार केले. आताच्या काळात लोकसभा निवडणुकीवेळी अजित घोरपडे हे संजयकाकासोबत नव्हते. आता आहेत...९९ साली मला कृष्णा खोऱ्याचे मंत्रिपद दिले तेव्हा अजितराव घोरपडे हे राज्यमंत्री होते. ते आमच्या बारामतीचे जावई आहेत. आज अजित घोरपडे, संजयकाका एकत्र येतायेत. नवी पिढी तयार केली पाहिजे. तुम्ही मला कवठे महांकाळमधून लीड द्या असं आवाहन दादांनी केले.
अजित पवार अन् आबांमध्ये लागती होती पैज
२००४ साली मला तरुणांना संधी द्यायची आवड, त्यात आपला नेता कोण करायचा हे सुरू होते. पद्मसिंह पाटील, विजयदादा, छगन भुजबळ, आर.आर पाटील, जयंत पाटील असे ५ जण उभे राहिले, मग पक्षात मतदान झाले, त्यात ४ लोकांना इतकी कमी मते पडली की आता ते जाहीर करू नका, यालाच करून टाका, एवढी मते आर.आर आबाला मिळवून दिली. इतकी मते मी आबांना मिळवून देऊ शकतो मग तुझ्या जागी मीच का उभा राहिलो नसतो. मात्र मी म्हटलं नाही, गरिब कुटुंबातला, ग्रामीण भागातला शिक्षण फार कष्टाने घेतले. तेव्हा आर.आर आबा उपमुख्यमंत्री झाले. खरेतर मुख्यमंत्री झाला असता, साहेबांनी का सोडले माहिती नाही. आपल्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा होत्या. ४ खाती जास्त घेऊन मुख्यमंत्रिपद सोडून दिले. जर तेव्हा मुख्यमंत्रिपद घेतले असते तर आजपर्यंत राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राहिला असता. २००४ साली आमच्यात बेट लागली, काँग्रेसपेक्षा आपल्या जागा जास्त येतील. तेव्हा जर असं झालं तर माझ्याकडून तुला नवी कोरी स्कोडा कार भेट देतो असं सांगितले. जास्त जागा आल्यावर लगेच नवीन कार त्याच्या घरी पाठवली. पैज लावली होती, त्याने जिंकली असा किस्साही अजित पवारांनी सांगितला.
तासगावातील कामावर टीका
तासगावातील सूतगिरणीची काय अवस्था आहे...? पलूस, सांगोला इथल्या सूतगिरणी चांगल्या चालतात मग इथं अशी अवस्था काय... तालुक्यातील खरेदी विक्रीची काय अवस्था आहे....काम होत नाही मग नुसती बटणे कशाला दाबता. भावनिक होऊन मते देऊन प्रश्न सुटत नाही. केंद्र सरकार ज्या विचाराचे त्या विचाराचे राज्य सरकार यायला हवं. लाडकी बहिण योजना चांगली की वाईट...टीका करतायेत त्या शहाण्यांना सांगा. या योजनेचा अनेक महिलांना फायदा होतोय. ही योजना बंद करण्याचं स्वप्न पाहणाऱ्याचं काय करणार, त्यांना मतदान करणार का तर नाही. तासगावात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्याची सहकार विभागात चौकशी सुरू आहे. कृषी विभागाने ३० एकर जागेत विस्तारीत बाजार समितीचं काम रखडलं आहे. कामाचा पाठपुरावा करावा लागतो. भावनिक होऊन कामे होत नाहीत. द्राक्ष, बेदाणा उत्पादकांची लूट केली जातेय. तासगाव तालुक्यात शैक्षणिक संस्था, तरुणांच्या हाताला काम देणारे उद्योग आलेत का असा सवाल अजित पवारांनी तासगावकरांना विचारला.
दरम्यान, २०१४ साली प्रत्यक्ष निकाल पूर्ण झाला नाही तेव्हा भाजपाला बिनशर्त पाठिंबा बाहेरून देण्याचा निर्णय झाला होता. सरकार बनत नव्हते ते करायला पाहिजे होते असं मला सांगितले. मी आता केले ते चुकीचे आणि २०१४ साली तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्य असं कसं चालेल...? १० जून १९९९ साली परकीय मुद्द्यावरून सोनिया गांधींना विरोध करत आपण राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभा झाली, त्यानंतर लगेच विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री झाला. ४ महिन्यापूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडलो, काँग्रेसनं हाकलवून दिले. सत्ता असल्याशिवाय कामे होत नाही असं सांगितले. मग मी कामे करण्यासाठीच सरकारमध्ये गेलो मग काय चुकीचे केले...? तासगावात आलो तर इथलं बस स्थानक पाहिले इतकी वाईट अवस्था, बारामतीत येऊन आम्ही बांधलेले बसस्थानक बघा. नेतृत्वात धमक आणि ताकद असावी लागते. नुसतं भाषण करून पोट भरत नाही. भाषण करून मुलामुलींना रोजगार मिळणार नाही असं अजित पवारांनी सांगितले.