“तुला लंकेंनी पाठवले का?”; भरसभेत अजित पवार संतापले; कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 11:52 AM2024-10-20T11:52:52+5:302024-10-20T11:53:25+5:30

Maharashtra Assembly Election 2024 NCP DCM Ajit Pawar News: खासदारकी त्यांच्याकडे आहे. आता आमदारकी घरात घ्यायला निघाले आहेत. जर दोन्हीही एकाच घरामध्ये गेले, तर तुम्हाला कोणीही वाली राहणार नाही, अशी टीका अजित पवार यांनी निलेश लंकेंवर केली.

maharashtra assembly election 2024 ajit pawar slams ncp sp group mp nilesh lanke | “तुला लंकेंनी पाठवले का?”; भरसभेत अजित पवार संतापले; कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले

“तुला लंकेंनी पाठवले का?”; भरसभेत अजित पवार संतापले; कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले

Maharashtra Assembly Election 2024 NCP DCM Ajit Pawar News: मागच्या काळात मीच निलेश लंकेंना राष्ट्रवादीत घेतले, निवडून आणले. पण माणसे एखाद्या पदावर गेले की बदलतात. तसेच निलेश लंकेंचे झाले, ते बदलले. आता खासदारकी त्यांच्याकडे, आमदारकी सुद्धा ते त्यांच्याच घरात घ्यायला निघाले आहेत. त्यामुळे जर दोन्हीही एकाच घरामध्ये गेले तर तुम्हाला कोणीही वाली राहणार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

एका सभेत अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करत असतानाच एका कार्यकर्त्याने खालून जोरदार घोषणाबाजी सुरु केली. दुष्काळी पारनेर तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी सभेदरम्यान बॅनर फडकवत 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', अशी घोषणाबाजी केली. सभेत व्यक्ती आणल्याने संतापलेल्या अजित पवार यांनीही 'आम्ही कुठे म्हणतो आमच्या बापाचे? असा प्रतिसावाल करत सभेत व्यत्यय आणू नका, असे ठणकावून सांगितले.

तुला कोणी लंकेंनी पाठवले का?

अजित पवार संतापले आणि त्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की, थांब ना, मी तेच सांगतोय. तुझ्या जे मनात आहे ना तेच माझ्या बोलण्यातून बाहेर पडणार आहे. थांब जरा. मात्र, कार्यकर्ता तरीही घोषणाबाजी करत राहिला. त्यानंतर पुन्हा अजित पवार म्हणाले की, मी पण शेतकरी आहे. मलाही फार कळते. तुला कोणी लंकेंनी पाठवले का? ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात. कशाला मला बोलायला लावता, असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावले.

दरम्यान, या झालेल्या प्रकारावर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्या मतदारसंघात गेल्यानंतर सर्वसामान्य माणसांचा जो आवाज आहे, तो आवाज त्यांच्या कानावर आल्यामुळे सहाजिकच ते माझे नाव घेणारच. त्यामुळे यामध्ये वेगळे काही नाही. कारण त्या ठिकाणचा बच्चा बच्चाही हमारा नाम बोलते है. त्यामुळे येथे येणारा नेताही चुकीने का होईना माझे नाव घेणारच, असा खोचक पलटवार निलेश लंके यांनी केला.

 

Web Title: maharashtra assembly election 2024 ajit pawar slams ncp sp group mp nilesh lanke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.