अशोक पाटील, इस्लामपूर Maharashtra Vidhan Sabha Election 2024: इस्लामपूर मतदारसंघात (Islampur Assembly Election 2024) गेली सात विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना विशेषतः भाजपा नेत्यांकडून घेरण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. यावेळी मात्र वस्ताद शरद पवार यांच्याच तालमीत तयार झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे इस्लामपूर मतदारसंघाची जबाबदारी आली. काट्याने काटा काढण्याचा डाव महायुतीतून आखला आहे.
जयंत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षातून भाजपामध्ये आलेले निशिकांत पाटील यांना उमेदवारी देऊन अजित पवार यांनी खेळी केली आहे. इस्लामपूर मतदारसंघाची बारामती करण्याचे जयंत पाटील यांनी अनेकदा बोलून दाखविले. पण हे अपुरे स्वप्न राहिल्याचा धागा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना इस्लामपूर येथे झालेल्या मेळाव्यात टार्गेट केले.
तसेच, स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही, असा टोमणाही त्यांनी मारला. त्यामुळे इस्लामपूरची विधानसभा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे पुतणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप गांभीर्याने घेतल्याचे दिसते.
सोशल मीडियावरून समर्थकांचे वॉर...
इस्लामपूरचे बारामती करण्यावरून सोशल मीडियावर जयंत पाटील, अजित पवार व निशिकांत पाटील यांना एकमेकांच्या समर्थकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. इस्लामपूरचे बारामती करण्याऐवजी बारामतीने इस्लामपूरचा धडा घ्यावा, असाही सल्ला जयंत पाटील समर्थकांनी अजित पवार यांना दिला आहे. अशा पद्धतीने दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी एकमेकांना ट्रोल करण्याचे वॉर सुरू झाल्याने नागरिकांची करमणूक होत आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीवेळी ठिणगी...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यावेळी शरद पवार यांना सोडून राष्ट्रवादीतील ज्येष्ठ मंडळी सर्वजण अजित पवार यांच्यासोबत गेली. त्यांनी भाजपला पाठिबा दिला. मात्र, जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले. हा राग अजित पवार यांना असावा.
त्यामुळे त्यांनी इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली. त्यासाठी निशिकांत पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घडवून आणण्यात आला.
त्यानंतर त्यांना तिकीट देऊन उमेदवारी अर्ज भरताना अजित पवार स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी येथे सभाही घेतली. त्यामुळे इस्लामपूरच्या या लक्षवेधी लढतीकडे राज्याचे लक्ष लागून संपूर्ण राहिले आहे.