राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून पक्षाचे दोन गट पडल्यानंतर बारामतीमध्येअजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीमध्येअजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, काल बारामतीमध्ये झालेल्या सभेत शरद पवार यांनी अजित पवार यांची केलेली नक्कल चर्चेचा विषय ठरली होती. आता नक्कलीवरून अजित पवार यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. इतके दिवस मला वाटायचं की राज ठाकरे हेच नक्कल करतात. पण काल दुसरं माणूस डोळ्यासमोर आलं, असे अजित पवार म्हणाले.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांनी शरद पवार यांनी केलेल्या त्यांच्या नक्कलीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शरद पवार यांनी माझी केलेली नक्कल मी पाहिली नाही. मी काल सांगली जिल्ह्यातल्या दोन मतदारसंघात होतो. त्यानंतर कोल्हापूरला गेलो. पण या नकलेबाबत माझ्या कानावर आलं. तो त्यांच्या अधिकार आहे, मी त्यावर काही अधिक बोलणार नाही. पण एक गोष्ट सांगतो की, पवारसाहेबांना ज्या उंचीवर महाराष्ट्र बघतो, भारत देश बघतो, एक राष्ट्रीय नेता, एक प्रगल्भ नेता म्हणून पाहतो. त्या नेत्याने अशा प्रकारे नक्कल करणं अनेकांना आवडलेलं नाही. इतरांनी कुणी केली असती, युगेंद्रने केली असती किंवा आणखी कुणी केली असती तर चालून गेलं असतं, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार भावनिक होण्याच्या घटनेबाबत म्हणाले की, त्यावेळी एक झालं, माझ्या आईचं नाव घेतल्यानंतर माझ्या वडिलांचं नाव घेतल्यानंतर थोडासा मी भावनिक झालो. पण मी लगेचच थोडा थांबलो. पाणी प्यायलो आणि विषय बदलला. ठीक आहे, माणूस आहे, प्रत्येक जणाला काही भावना असतात. मवन असतं. कठोर कठोर म्हणून सारखंच कुणी कठोर असतं, अशातला काही भाग नाही. कधी कधी असं काही होतं. पण ते अगदी नैसर्गिकरीत्या झालं, असं अजित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, नक्कलीवरून शरद पवार यांना टोला लगावताना अजित पवार म्हणाले की, इतके दिवस मला वाटायचं की राज ठाकरे हेच नक्कल करतात. पण काल दुसरं माणूस डोळ्यासमोर आलं. पण आज माझ्या मनाला वेदना झाल्या. मी साहेबांना दैवत मानलं. पण त्यांनी माझी नक्कल करावी, आम्ही घरातली माणसं आहोत. लहानाची मोठी त्यांच्यासमोर झालो आहोत. त्यांनी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी केल्या. कुठेही कमी पडलो नाही. राजकारणात आलो तेव्हापासून सांगायचं तर मी कधी दिल्लीला गेलो नाही. दिल्लीवाले मला अजूनही ओळखत नाहीत. आपलं काम भलं आणि आपण भलं, याच पद्धतीने मी पुढे गेलो, असे अजित पवार म्हणाले.