लखनऊ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि महाशक्ती अशा तीन आघाड्यांमध्ये फाईट होणार आहे. यामुळे एकतर त्रिशंकू स्थिती किंवा तिसऱ्या आघाडीने मते फोडल्यामुळे सर्वच जागांवर अटीतटीची लढत होऊन मविआ आणि महायुती सत्तास्थापनेसाठी देखील काठावर पास होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच महायुती आणि आघाडी या दोघांनाही ५०-५० टक्के संधी दिसत आहे. यातच या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी उत्तर प्रदेशचा समाजवादी पक्ष या निवडणुकीला साधण्याच्या प्रयत्नात आहे.
यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या सपाने अन्य राज्यांत विस्तार करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. १८ ऑक्टोबरला अखिलेश यादव मिशन महाराष्ट्राची सुरुवात करणार आहेत. मालेगावमध्ये ते एक मोठी रॅली करणार आहेत. मालेगाव हे मुस्लिम बहुल आहे. यानंतर १९ तारखेला धुळ्यातही ते राजकीय सभा घेणार आहेत.
महाराष्ट्रात काहीही नसताना सपाचे दोन आमदार आहेत. मानखूर्द शिवाजी नगरमधून अबू आझमी आणि भिवंडी पूर्वहून रईस शेख. उत्तर प्रदेशातून कोणीही प्रचाराला आलेले नसताना दोन आमदार तर लक्ष घातले तर किती? असा प्रश्न सपा प्रमुखांना खुणावत आहे. महाराष्ट्रात सपा जवळपास ३० जागांवर आपली व्होटबँक असल्याचा दावा करत आहे. यातून सपा मविआकडून १०-१२ जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सपाने २००९ मध्ये ४ जागा जिंकल्या होत्या. परंतू, २०१४ मध्ये एकच जागा आली होती.
सपा महाराष्ट्रात आलेल्या सर्वात मोठा फटका हा एआयएमआयएमच्या ओवेसी यांना आणि शरद पवार-अजित पवारांच्या राष्ट्रवादीला व काँग्रेसला बसणार आहे. AIMIM चे धुळे शहर आणि मालेगाव मध्य अशा दोन ठिकाणी २०१९ मध्ये आमदार निवडून आले होते. तिथेच अखिलेश यादव लक्ष ठेवून आहेत. तिथे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे सपा हे मतदारसंघ साधण्याच्या प्रयत्नात आहे. महत्वाची बाब म्हणजे सपाच्या धुळ्यातील उमेदवाराला २०१९ मध्ये केवळ ८०० मते मिळाली होती.
सपाला मविआत जागा दिल्यास त्याचा फटका राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच जास्त बसणार आहे. कारण या दोघांच्याही अल्पसंख्यांक बहुल असलेल्या मतदारसंघांवर दावा आहे. या जागा सपाला सोडाव्या लागणार आहेत. जर मविआत सपा आली नाही तर या दोघांची मते सपाला जाऊन मतविभागणीचा फटका बसू शकतो. तिसरी आघाडी आल्याने आधीच राज्यातील राजकीय परिस्थिती बदललेली असताना आता सपाच्या दबावामुळे मविआमध्ये टेन्शनचे वातावरण आहे.