विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपाचे नेते अमित शाह हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर अमित शाह हे आज नाशिक येथे पोहोचले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र दौऱ्यावर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा उल्लेख बाजारबुणगे असा केला असून, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रामधून कुणीच संपवू शकत नाहीत, असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे.
भाजपा आणि अमित शाह यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की, तुमच्यामध्ये सध्या भेसळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तो भेसळीचा कार्यक्रम तुम्हाला मान्य आहे का? हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही थोतांड माजवलेलं आहे. हे हिंदुत्व माझं नाही. माझं हिंदुत्व वेगळं आहे. कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजारबुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला संपवण्याची भाषा करून गेले. आता ते भाषण मीपण ऐकलेलं नाही आहे. पण या बाजारबुणग्यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचा आहे. पण हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे. काल नागपूरला आलेला हा बाजारबुणगा उद्धव ठाकरेंना खतम करा, शरद पवार यांना खतम करा, असं म्हणाला. हिंमत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो हे दाखवून देतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
दरम्यान, भाजपाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरचिटणीस दिनेश परदेशी यांनी आज मातोश्रीवर येत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी दिनेश परदेशी यांचं उद्धव ठाकरे यांनी पक्षात स्वागत केलं. परदेशी हे वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.