मुंबई - २०१९ च्या निवडणूक निकालानंतर राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली. त्यात उद्योगपती गौतम अदानी हेदेखील पडद्यामागून सरकार स्थापनेत हालचाल करत असल्याचं समोर आले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील बैठकांमध्ये गौतम अदानी यांचाही सहभाग होता असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत सांगताना अजित पवारांनी एका मुलाखतीत या सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे.
अजित पवार म्हणाले की, ५ वर्षापूर्वी काय घडले, कुठे बैठक झाली, त्यात कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे. अमित शाह होते, गौतम अदानी होते, प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस मी स्वत: आणि शरद पवारसाहेबही बैठकीत होते. पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने जे शरद पवार सांगतात तेच आम्ही पाळत होतो असा दावा अजित पवारांनी केला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे सरकार ८० तास टिकले कारण शरद पवारांनी पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर बहुतांश आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतले. त्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार बनवलं.
तर शरद पवार हे अशा प्रकारचे व्यक्ती आहेत ज्यांच्या मनाचा अंदाज कुणालाही बांधता येत नाही. जगातील एकही व्यक्ती भाकीत वर्तवू शकत नाही. ना माझी काकू, ना सुप्रियाही सांगू शकत नाही असं उत्तर अजित पवारांनी दिले. शरद पवारांनी असं का केले असेल असा प्रश्न त्यांना मुलाखतीत विचारण्यात आला होता. याबाबत सुप्रिया सुळेंना विचारले असता अशाप्रकारे कुठल्याही बैठकीची मला माहिती नाही. अजित पवारांनी उल्लेख केलेल्या बैठकीबाबत मला कुठलीच कल्पना नाही असं सांगितले आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या या मुलाखतीवरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी टीका केली आहे. एका डिजिटल प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत एका ज्येष्ठ मंत्र्याने गौतम अदानी कशाप्रकारे महाराष्ट्रात भाजपाचं सरकार यावे यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितले. त्यामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. ते भाजपाचे अधिकृत मार्गदर्शक आहेत का, ज्यांच्यावर युती करण्याची जबाबदारी देण्यात आली होती? महाराष्ट्रात कुठल्याही किंमतीत भाजपा सत्तेत यावी यासाठी इतक्या तत्परतेने त्यामागे काम का करत होते असा सवाल उपस्थित केला आहे.